गाले येथे खेळल्या श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा फलंदाज धनंजया डी सिल्वाने अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर तो विचित्र पद्धतीने हिट विकेट झाला. चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात डी सिल्वाने आपली बॅट यष्ट्यांवर मारली.

ही घटना श्रीलंकेच्या डावातील ९५व्या षटकात घडली. शॅनन गॅब्रिएलने चेंडू टाकला. यात ऑफ साइडवर खेळण्याच्या नादात चेंडूने धनंजयाच्या बॅटची कड घेतली. यानंतर तो चेंडू यष्ट्यांवर जात होता, तेव्हा तो रोखण्याच्या प्रयत्नात असलेल्या धनंजयाने आपली बॅट चुकून यष्ट्यांवर मारली. त्याच्या या हिट विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – आरंभ है प्रचंड..! ‘या’ तारखेपासून रंगणार IPL २०२२ स्पर्धा; पहिल्या सामन्यात धोनी ब्रिगेड आणि…

डि सिल्वाने बाद होण्यापूर्वी ९५ चेंडूंचा सामना केला आणि पाच चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. गाले कसोटीच्या पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या फलंदाजांना दुसऱ्या दिवशी आपल्या चांगल्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. कालच्या धावसंख्येत ११९ धावांची भर घालत संघाने त्यांचे सर्व ७ विकेट गमावले. संघाकडून सलामीवीर दिमुथ करुणारत्नेने सर्वाधिक धावा केल्या. करुणारत्नेने ३०० चेंडूत १५ चौकारांसह १४७ धावा केल्या. याशिवाय डि सिल्वा आणि पाथुम निसांकानेही अर्धशतके झळकावली, तर दिनेश चंडिमलनेही ४५ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने ८३ धावांत ५ बळी घेतले.