ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील प्राथमिक फेरीच्या कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धाराने श्रीलंका आणि बांगलादेशचे खेळाडू रविवारी मैदानात उतरतील. या लढतीत श्रीलंकेच्या फिरकीपटूंपासून बांगलादेशला सावध राहावे लागेल.

श्रीलंकेने सलग तीनही लढती जिंकून दिमाखात ‘अव्वल-१२’ फेरी गाठली. त्यामुळे दसुन शनकाच्या श्रीलंकेचे पारडे जड मानले जात असून वानिंदू हसरंगा आणि महीष थीक्षना यांची फिरकी जोडी यामागील प्रमुख कारण आहे. या जोडीने प्राथमिक फेरीच्या तीन सामन्यांतच १४ बळी मिळवून प्रतिस्पध्र्यांच्या नाकीनऊ आणले. हसरंगा अष्टपैलू योगदानही देत असून फलंदाजीत अविष्का फर्नांडो, कुशल परेरा यांच्यावर श्रीलंकेची भिस्त आहे.

दुसरीकडे, बांगलादेशने तीनपैकी दोन सामने जिंकून आगेकूच केली. दोन्ही विजयांत सामनावीर पुरस्कार पटकावणाºया शाकिब अल हसनवर (८८ धावा, ७ बळी) बांगलादेशची सर्वाधिक मदार असेल. कर्णधार महमदुल्ला आणि मोहम्मद नईम फटकेबाजी करण्यात पटाईत आहेत. गेल्या तीन महिन्यांत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड संघांना ट्वेन्टी-२० मालिकेत धूळ चारल्यामुळे बांगलादेशचा आत्मविश्वास उंचावला आहे.

संघ

श्रीलंका : दसुन शनका (कर्णधार), कुशल परेरा, दिनेश चंडिमल, पथुम निस्सांका, चरिथ असलंका, धनंजय डीसिल्व्हा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, वानिंदू हसरंगा, महीष थीक्षना, अकिला धनंजया, दुश्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो.

बांगलादेश : मोहम्मद महमदुल्ला (कर्णधार), लिटन दास, मोहम्मद नईम, शाकिब अल हसन, मेहेदी हसन, सौम्य सरकार, मुशफिकूर रहिम, नुरुल हसन, अफिफ होसेन, नसुम अहमद, तस्किन अहमद, शमिम होसेन, मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिजूर रहमान, शोरीफुल इस्लाम.

११ उभय संघांत ११ ट्वेन्टी-२० सामने झाले असून श्रीलंकेने त्यापैकी सात, तर बांगलादेशने चार लढती जिंकल्या आहेत.

२ श्रीलंका-बांगलादेश ट्वेन्टी-२० विश्वचषकात दुसऱ्यादा आमनेसामने येत असून २००७ मध्ये झालेल्या एकमेव लढतीत श्रीलंकेने विजय मिळवला होता.

’ वेळ : दुपारी ३.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, स्टार स्पोटर्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)