भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या निर्णायक सामन्यात हसरंगाने दमदार कामगिरी केली. या अटीतटीच्या सामन्यात हसरंगाने आपल्या भेदक गोलदांजीचं प्रदर्शन केलं. विशेष म्हणजे आज हसरंगाचा वाढदिवस असल्याने ही कामगिरी त्याच्या स्मरणात राहणार आहे. त्याने भारताचे चार गडी बाद करत भारताला ८१ या धावसंख्येवर रोखलं. त्याने चार षटकात केवळ ९ धावा दिल्या आणि महत्त्वाचे ४ खेळाडू बाद केले. हसरंगाने ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, भुवनेश्वर कुमार आणि वरूण चक्रवर्थीला तंबूचा रस्ता दाखवला. .

भारताचे दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर संजू सॅमसन फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. मात्र त्याला त्याने मैदानात तग धरू दिला नाही. त्याने संजू सॅमसनला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला. संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. त्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या हसरंगाने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. १४ या धावसंख्येवर खेळत असलेल्या ऋतुराज गायकवाडला पायचीत करत बाद केलं. त्यानंतर भारतीय फलंदाजावर दडपण वाढत गेलं. या दडपणाचा फायदा हसरंगाला झाला.

हंसरंगाने तळाच्या भुवनेश्वर कुमार आणि वरुण चक्रवर्थीला झटपट बाद केलं. भुवनेश्वर कुमारनं मैदानात भारताची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र भुवनेश्वर कुमारला १६ या धावसंख्येवर असताना शनाकाच्या हाती झेल देत बाद केलं. तर वरुण चक्रवर्थीला खातंही खोलू दिलं नाही.