हितसंबंधांच्या मुद्दय़ावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या एन. श्रीनिवासन यांनी बीसीसीआयची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले असहे. सर्वोच्च न्यायालयासमोर श्रीनिवासन यांच्या वकिलांनी त्यांची भूमिका मांडली. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडणुकीला उभे राहण्यात स्वारस्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
२२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे श्रीनिवासन यांना बीसीसीआयमधील प्रशासकीय पदावर कार्यरत असताना आयपीएल संघाची मालकी घेण्याच्या मुद्दय़ावर न्यायालयाने आक्षेप घेतला होता. या दोनपैकी एकच भूमिका स्वीकारण्याचा पर्याय न्यायालयाने श्रीनिवासन यांच्यासमोर ठेवला होता.
कायदेशीरदृष्टय़ा अडचणीत असतानाही नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवण्याच्या मुद्दय़ावरून बिहार क्रिकेट संघटनेने श्रीनिवासन यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि एफ.एम. आय कैलिफुला यांच्या खंडपीठाने श्रीनिवासन यांनी अध्यक्षपद कसे भूषवले असा सवाल केला.
‘‘हितसंबंधाच्या मुद्दय़ावरून दोषी आढळलेले असतानाही तुम्ही बीसीसीआयच्या बैठकीचे अध्यक्षस्थान का भूषवले,’’ असे खंडपीठाने श्रीनिवासन यांचे वकील कपिल सिब्बल यांना विचारले. ‘‘आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाच्या चौकशीत तुम्ही हस्तक्षेप केला नाहीत. मात्र हितसंबंधाच्या कारणामुळे श्रीनिवासन यांना बीसीसीआयची निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या संघटनेच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवण्याचाही त्यांना अधिकार नाही,’ अशा शब्दांत न्यायालयाने सिब्बल यांना सुनावले.