सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतरही एन. श्रीनिवासन दुबईमध्ये ९ आणि १० एप्रिलला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी मंडळीच्या बैठकीला बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, श्रीनिवासन आयसीसी कार्यकारी मंडळाच्या बैठकीला हजर राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या सर्व कामकाजापासून दूर केले आहे. मात्र आयसीसीसंदर्भात निर्णय देण्याचे टाळताना दोन न्यायमूर्तीच्या खंडपीठाने हा त्यांचा अंतर्गत मामला आहे, असे म्हटले होते.
साधारणत: आयसीसी मंडळाच्या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष हे संचालक म्हणून उपस्थित राहतात, तर आयसीसी मुख्य कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सचिव उपस्थित राहतात. प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेला आयसीसीच्या बैठकीसाठी पाठवला जाणारा प्रतिनिधी म्हणून बीसीसीआयच्या अध्यक्षावर शिक्कामोर्तब होते. चेन्नईत २९ सप्टेंबर २०१३ला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीनिवासन आणि संजय पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पटेल यांनी सांगितले होते की, श्रीनिवासन आयसीसीवर बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतील.
नुकतेच फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन्सने (फिका) आयसीसीला विनंती केली होती की, श्रीनिवासन यांना कार्यकारी मंडळावरून दूर करावे. याचप्रमाणे ते निर्दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांना आयसीसीच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देऊ नये. जुलै महिन्यापासून ते हा पदभार सांभाळणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतरही आयसीसीने त्यांच्याबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. ‘‘सध्या याबाबत कोणतीही प्रतिक्रिया नाही,’’ असे आयसीसीने वारंवार सांगितले.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांच्या आयसीसीच्या जबाबदाऱ्यांबाबत कोणताही विरोध दर्शवलेला नाही. त्यामुळे त्यांनी आयसीसीच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास कोणतीही हरकत नाही.