वृत्तसंस्था, पॅरिस भव्य ‘स्टाड डे फ्रान्स’ स्टेडियमला रविवारी एखाद्या मोठ्या ‘कॉन्सर्ट हॉल’चे स्वरूप प्राप्त झाले होते. जगभरातील अलौकिक क्रीडा गुणवत्तेच्या गेल्या १५ दिवसांतील प्रदर्शनानंतर नेत्रदीपक आणि चित्तथरारक समारोप सोहळ्याने पॅरिस ऑलिम्पिकवर पडदा पडला आणि वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी ऑलिम्पिकचा ध्वज लॉस एंजलिसकडे सोपविण्यात आला. दोन आठवड्यांपूर्वी सेन नदीवर झालेल्या नावीन्यपूर्ण आणि ना-भूतो अशा उद्घाटन सोहळ्यात फ्रान्सच्या स्थापत्यकलेचे आणि देशाच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडले होते. समारोपाची संध्याकाळही अशीच मंत्रमुग्ध करणारी होती. समारोप सोहळ्याची सुरुवात ‘मार्सी पॅरिस’ने झाली. या फ्रेंच शब्दाचा अर्थ ‘आभारी’ असा आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक चार सुवर्णपदके जिंकणारा फ्रान्सचा जलतरणपटू लेऑन मारशॉने मैदानात प्रवेश केला आणि १५ दिवस एका फुग्यात तेवत असणारी ऑलिम्पिक ज्योत शांत करण्यात आली आणि समारोप सोहळ्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. स्पर्धेत सहभागी झालेल्या २०५ देशांच्या ध्वजवाहकांनी भव्य स्टेडियममध्ये कोरलेल्या जगाच्या नकाशावर प्रदक्षिणा घातली. हेही वाचा >>>Neeraj Chopra Net Worth: नीरज चोप्राची संपत्ती किती? सुवर्णपदक विजेता पाकिस्तानच्या अरशद नदीमकडे फक्त… आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी ऑलिम्पिक स्पर्धांचा समारोप झाल्याचे जाहीर करताना सहभागी खेळाडूंसह स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या स्वयंसेवकांचे आभार मानले. यानंतर पॅरिसच्या महापौर अॅन हिडाल्गो यांनी लॉस एंजलिस शहराचे महापौर कॅरेन बास यांच्याकडे ऑलिम्पिक ध्वज सुपूर्द केला. अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये पुढील म्हणजेच २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहेत. समारोप सोहळ्याची सुरुवात प्रसिद्ध फ्रेंच गायक झाहो डी सागाझान यांनी गायलेल्या ‘सुस ले सिएल डी पॅरिस’ या गाण्याने झाली. त्यानंतर सर्व सहभागी २०५ देशांच्या ध्वजवाहकांनी मैदानात प्रवेश केला. ऑलिम्पिक हे सर्वसमावेशकता आणि लिंग समानतेबद्दल आग्रही असते हे पॅरिस ऑलिम्पिकने दाखवून दिले. या वेळी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिला मॅरेथॉनचे पदक वितरण समारोप सोहळ्यात करण्यात आले. त्याच वेळी स्पर्धा यशस्वी पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका राहिलेल्या सुमारे ४५ हजार स्वयंसेवकांचाही गौरव करण्यात आला. हेही वाचा >>>Graham Thorpe: इंग्लंडचे माजी क्रिकेटर ग्रॅहम थॉर्प यांचा मृत्यू आजारपणाने नव्हे तर ती आत्महत्या, पत्नीकडून मोठा खुलासा, का उचललं टोकाचं पाऊल? टॉम क्रूझचा ‘स्टंट’ अशक्यप्राय वाटणारे स्टंट स्वत: करण्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता टॉम क्रूझ स्टेडियमच्या छतावरून दोरीच्या साहाय्याने व्यासपीठापर्यंत आला. त्याने खेळाडूंची भेट घेतली. तसेच गायक बिली इलिश, रॅपर स्नून डॉग आणि डॉ. ड्रे यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेत सोहळा संस्मरणीय केला. जवळपास तीन तास चाललेल्या या सोहळ्यात थॉमस बाख यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँही उपस्थित होते. मनू, श्रीजेश ध्वजवाहक समारोप सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि हॉकी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश हे भारताचे ध्वजवाहक होते. मनूने पॅरिस स्पर्धेत दोन कांस्यपदके पटकावली, तर हॉकी संघाच्या ‘कांस्य’यशात श्रीजेशची भूमिका निर्णायक ठरली. या दोघांसह रौप्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि कांस्यपदक विजेता कुस्तीगीर अमन सेहरावत यांचाही समारोप सोहळ्यासाठीच्या भारतीय पथकात समावेश होता. दरम्यान, भारतीय पथकाला टीव्हीवर फारसा वेळ दाखवण्यात न आल्याने चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.