भारताचा धडाडीचा फलंदाज विरेंद्र सेहवाग सुरुवातीला सचिन तेंडुलकरची नक्कल करायचा, पण वर्षभरातच त्यानं स्वत:तल्या सेहवागला शोधलं आणि महान फलंदाज झाला. इंग्रजीची भीती, ते दडपण जुगारण्यासाठी असलेली अनोखी पद्धत अशा विरेंद्र सेहवागचे अनेक किस्से सांगितलेत स्टँड अप कॉमेडियन विक्रम साठये यांनी. एबीपी माझाच्या एका मुलाखतीत साठये यांनी सेहवागचे काही किस्से सांगितलेत.

एका टूर्नामेंट दरम्यान सेहवाग म्हणाला मला मॅन ऑफ दी मॅच नाही व्हायचंय. सामन्याआधीच तो म्हणाला, काही पण होऊ दे मला मॅन ऑफ दी मॅच नको मिळायला. कारण मग रवी शास्त्री इंग्रजीत प्रश्न विचारणार नी मला काही बोलता येणार नाही.

आणि नेमकं त्यालाच मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला, नी शास्त्रीनं भल्या मोठ्या अलंकारिक भाषेत सामन्याचं वर्णन करून, त्याची स्तुती करून प्रश्न विचारला की हे कसं काय जमलं… सेहवागचं उत्तर होतं… ऐसी कोई बात नही है, बॉल बल्ले पे आ रहा था, बस मैने मार दिया!

ड्वेन ब्राव्होची हरवलेली बॅट सचिन तेंडुलकरनं कशी शोधली? वाचाल तर चकित व्हाल…

सेहवाग सचिनसारखी फलंदाजी करायचा, जे नंतर बदललं, त्या बद्दल साठयेंनी सेहवागला विचारलं. तेव्हा सेहवागनं सांगितलं की मला जर काही नाव कमवायचं असेल तर मला त्याच्या सारखं करता नाही येणार.. कारण मग मी सचिन बनण्याचा प्रयत्न करतोय असं होईल. हे मला एका वर्षानंतर कळलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं मला दुसऱ्यासारखं बनायचं नाहीये तर मला माझ्यातल्या सेहवागला शोधायचंय. म्हणून मग मी ओपनिंगला जायला लागलो, हार्ड हिटिंग करायला लागलो. कारण सचिन गांगुली असताना मला माझा वेगळा रस्ता शोधायला हवा हे लक्षात आलं, माझा ग्रेटनेस असेल तर हा आहे की मी माझा मार्ग शोधला.

बॅटिंग करताना सेहवाग गायचा. त्याचं कारण काय. कित्येक वेळा तो ओव्हर ओव्हर गायलाय. विक्रम साठयेंनी त्याला विचारलं की तू का गातोस? तेव्हा सेहवाग म्हणाला, जेव्हा प्रचंड दबाव असतो, तेव्हा मी नॉर्मल असताना कसा खेळलो असतो, तसा खेळ होण्यासाठी अशावेळी मी गातो. ज्यावेळी दबावामुळे मनात नकारात्मक विचार येतात, तेव्हा गाण्यामुळे तो नकारात्मक विचार निघून जातो आणि बॅटिंगवर त्या दबावाचा प्रतिकूल परिणाम होत नाही. त्यामुळे मागच्या बॉलचं दडपण पुढच्या बॉलवर जात नाही व नैसर्गिक खेळ खेळता येतो.

ज्यावेळी तुम्ही प्रचंड फोकस्ड असता, तेव्हा जास्त प्रेशरमध्ये असता नी जास्त दबावाखाली खेळलं की तुम्ही आउट होता. ज्यावेळी तुम्ही नॉर्मल पाथमध्ये खेळत असता त्यावेळी तुमची बॉडी नॉर्मली प्रतिक्रिया देते. असं नॉर्मल होण्यासाठी वेगवेगळे खेळाडू विविध प्रकार करतात. दबाव असताना राहुल द्रविड दीर्घ श्वसन किंवा डीप ब्रीदिंग करायचा, म्हणजे पुढच्या बॉलसाठी तो नॉर्मल व्हायचा. सेहवाग म्हणतो मला डीप ब्रीदिंग वगैरे जमत नाही मी गातो.