Tilak Varma Amruta Fadnavis Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि टी-२० संघाचा उपकर्णधार तिलक वर्माने मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील या व्हिडीओमध्ये असल्याचं दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोघेही चर्चा करताना दिसून येत आहेत.
ग्रॅव्हिटस फाऊंडेश तर्फे पुण्यात ऊर्जा अवॉर्ड्स २०२६ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या कुठलीही आंतरराष्ट्रीय टी-२० मालिका सुरु नसल्याने तिलक वर्माने या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. दोघेही एकमेकांसोबत चर्चा करताना दिसून आले. या चर्चेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ग्रॅव्हिटस फाऊंडेश तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तिलक वर्माचा विशेष सन्मान करण्यात आला. तिलक वर्मा सध्या भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार आहे. त्याने अनेकदा महत्वपूर्ण खेळी करुन भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. या कामगिरीची दखल घेऊन त्याचा सत्कार करण्यात आला. हा सन्मान स्वीकारल्यानंतर तिलक वर्मा म्हणाला, “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. देशातील कोट्यावधी क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण करणे हीच माझी सर्वात मोठी प्राथमिकता आहे. मी मैदानावर कठोर परिश्रम करून देशाची मान उंचावण्याचा प्रयत्न करत राहीन.”
अमृता फडणवीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान संबोधित करताना त्यांनी समाजात महिला आणि युवकांच्या महत्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, महिलांचे सक्षमीकरण आणि बालकांचा विकास यांची जबाबदारी केवळ सरकार किंवा प्रशासनाच्या भरोशावर सोडली जाऊ शकत नाही. सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाई सारख्या महान महिलांनी देशाला दिशा दाखवली होती आणि आजच्या समाजातही अशाच महिला नेतृत्वाची गरज आहे.
