Mohammed Shami In LSG: आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू व्हायला आणखी काही महिने शिल्लक आहेत. पण त्याआधी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी मिनी ऑक्शन होणार आहे. या लिलावाआधी सर्व संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. यादरम्यान खेळाडूंची अदला बदली देखील सुरू आहे. आयपीएल ट्रेडमध्ये बऱ्याच खेळाडूंची नावं समोर आली आहेत. पण आतापर्यंत केवळ शार्दुल ठाकूर अधिकृतरित्या लखनौ सुपर जायंट्स संघातून मुंबई इंडियन्स संघात दाखल झाला आहे. दरम्यान आणखी एक खेळाडू अधिकृतरित्या एका संघातून दुसऱ्या संघात गेला आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना दिसून आला होता. पण माध्यमातील वृत्तानुसार, आगामी हंगामापूर्वी त्याने लखनौ सुपरजायंट्स संघात प्रवेश केला आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर पडल्यानंतर, तो पुन्हा संघात स्थान मिळवू शकलेला नाही. कसून सराव करून त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आणि संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला. पण भारतीय संघात त्याला स्थान मिळालेलं नाही. मात्र, आगामी हंगामात तो लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने पोस्ट शेअर करून हिंट दिली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, मोहम्मद शमीला संघात घेण्यासाठी कुठल्याही खेळाडूची अदलाबदली करण्यात आलेली नाही. ही पूर्णपणे कॅश डील आहे. सनरायझर्स हैदराबादकडून शमीला जितकं मानधन दिलं जात होतं, तितकंच मानधन त्याला लखनौकडून देखील दिलं जाणार आहे. सनरायझर्स हैदराबादने त्याला १० कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. आता शमी या संघाकडून खेळताना कशी कामगिरी करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मोहम्मद शमी हा या स्पर्धेतील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. शमीला दिल्ली, गुजरात आणि पंजाबसारख्या संघांकडून खेळण्याचा अनुभव आहे. आता तो या अनुभवाचा कसा फायदा करून घेणार,हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, २०२७ चा वर्ल्डकप खेळायचा असेल तर शमीला आगामी वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
