मुंबई : नवी मुंबईत कबड्डी अकादमीच्या निर्मितीचा प्रस्ताव मंगळवारी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पनवेल येथे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर फुटबॉल हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे. २०२७ मध्ये एएफसी आशिया चषक स्पर्धेचे सामने या मैदानावर होणार आहेत. ४० हजार क्षमतेच्या स्टेडियमसह चार प्रशिक्षण केंद्रांचा यात समावेश आहे. याच प्रकल्पाच्या शेजारी रग्बीसाठीचा उपक्रम राबवला जात आहे. त्यामुळे कबड्डी अकादमी या परिसरात निर्माण झाल्यास खेळाडूंसाठी फायदेशीर ठरेल, असा प्रस्ताव मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या सभेमध्ये चर्चेला आला. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला ७०हून अधिक सभासद उपस्थित होते.

राज्य कबड्डी संघटनेच्या कार्यकारिणी समितीमध्ये आधी १६ जणांचा समावेश होता. त्यात सात पदांचा समावेश करण्यात आला आहे. उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव पदे सहाऐवजी सात करण्यात आली आहेत, कार्यकारिणी सदस्यांच्या पाच जागांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे, असे संघटनेचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी सांगितले. याशिवाय स्वीकृत सदस्यांऐवजी सल्लागार समिती नेमली जाईल. यात वंचित जिल्हे, प्रख्यात खेळाडू, आजीव सदस्य, पंच समिती आणि तांत्रिक समितीचे प्रमुख यांचा समावेश असेल.

अनधिकृत सामने खेळणाऱ्यांवर कारवाई

राज्य संघटनेची परवानगी न घेता झालेले सामने हे अनधिकृत असतील. यात खेळणारे खेळाडू, पंच याचप्रमाणे त्याचे आयोजन करणारा जिल्ह्याचा किंवा राज्याचा पदाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी तरतूद घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती  पाटील यांनी दिली.

महिलांच्या सक्रिय सहभागात वाढ

आतापर्यंत राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्याला तीन नामनिर्देशित प्रतिनिधींची नावे निश्चित करावी लागत होती. आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्याला चार नामनिर्देशित प्रतिनिधींची नावे पाठवता येणार असून, त्यात एक महिला सदस्य असणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिवांच्या प्रत्येकी दोन जागा तसेच कार्यकारिणी सदस्यांपैकी एक जागा महिलांसाठी राखीव असतील, असे पाटील यांनी सांगितले.