Yuvraj Singh Advice To Vaibhav Sooryavanshi: आयपीएल २०२६ स्पर्धेत एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. वयाच्या १३ व्या वर्षी आयपीएलमध्ये बोली लागली, १४ व्या वर्षी पदार्पणाची संधी मिळाली आणि पहिल्याच हंगामात त्याने वेगवान शतक झळकावलं. आयपीएल २०२६ स्पर्धेतील पहिल्या सामन्यातही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. चेन्नई सुपर किंग्ज संघाविरूद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने १५ चेंडूत वेगवान अर्धशतक झळकावलं. दरम्यान भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने त्याच्या फलंदाजीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. यासह १५ वर्षीय फलंदाजाला मोलाचा सल्ला देखील दिला आहे.
युवराज सिंगने काही दिवसांपूर्वीच १५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यामुळे तो भारताच्या वरिष्ठ संघात खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांनी अशी मागणी केली आहे, की त्याला भारतीय टी-२० संघात स्थान मिळायला हवं. युवराज सिंगला देखील असंच वाटतं की, तो लवकरच भारतीय संघासाठी खेळताना दिसू शकतो. त्याच्याकडे ती क्षमता आहे. वैभवचं कौतुक करताना युवराजने त्याला मोलाचा सल्ला देखील दिला आहे.
युवराज सिंगकडून वैभव सूर्यवंशीचं कौतुक
वैभवचं कौतुक करताना युवराज सिंग म्हणाला, “वैभवबद्दलची सर्वात खास गोष्ट म्हणजे, त्याच्या बॅटचा वेग. त्याच्या बॅटचा वेग अतिशय वेगवान आहे. खरं सांगू, तर मी फलंदाजी करत असताना, माझी बॅटसुद्धा इतक्या वेगाने येत नव्हती. मी खूप कमी खेळाडूंना या गतीने फलंदाजी करताना पाहिलं आहे. मला त्याच्याबद्दल सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, त्याने चांगल्या चेंडूवरही ऑफ साईडला षटकार मारले आहेत. यावरुन तो किती टॅलेंटेड आहे हे दिसून येतं.” मोलाचा सल्ला देत युवराज म्हणाला, “वैभवने आपले पाय जमिनीवर ठेवणं गरजेचं आहे. यासह त्याने मन शांत ठेवणं देखील गरजेचं आहे.”
पहिल्याच सामन्यात वेगवान अर्धशतक
राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाविरूद्ध पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ १२८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला होता. या धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने अवघ्या १५ चेंडूत वेगवान अर्धशतक झळकावलं. तो १७ चेंडूत ५२ धावांची खेळी करून माघारी परतला. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. राजस्थान रॉयल्सने १२८ धावांचे आव्हान अवघ्या १२.१ षटकात पूर्ण केले होते.
