प्रत्येक आयपीएल हंगामागणिक कामगिरीत घसरण होत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का बसला आहे. प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि फ्लेमिंग हा ऋणानुबंध अतिशय घट्ट होता. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळलेल्या फ्लेमिंग यांनी निवृत्तीनंतर प्रशिक्षकपद स्वीकारलं. तब्बल १८ वर्ष ते चेन्नईच्या प्रशिक्षकपदी होते. त्यांच्या प्रशिक्षक काळात चेन्नईने ५ आयपीएल जेतेपदांसह चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या दोन जेतेपदांवर नाव कोरलं. चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि फ्लेमिंग यांची केमिस्ट्री अनोखी होती.

फ्लेमिंग यांनी चेन्नईच्या ताफ्यातील जोबर्ग सुपर किंग्ज आणि आणि टेक्सास सुपर किंग्स संघाच्या प्रशिक्षकपदाचाही राजीनामा दिला आहे. सलग तीन हंगाम चेन्नईचा संघ जेतेपदापासून दूर राहिला आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईला आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. गेल्या वर्षी तर चेन्नईचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी फेकला गेला होता.

‘१८ वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे. चेन्नई सुपर किंग्सचं प्रशिक्षकपद भूषवणं हा कारकिर्दीतील गौरवशाली क्षणांपैकी एक आहे. चेन्नईने जिंकलेल्या प्रत्येक सामन्याचा, जेतेपदाचा अभिमान वाटतो. आम्ही नेहमीच संघ म्हणून खेळायला उतरलो. आम्ही एक कुटुंब म्हणून वावरलो. चेन्नईने प्रचंड प्रेम आणि पाठिंबा दिला. चेन्नई सुपर किंग्सशी ऋणानुबंध कायम राहील’, असं फ्लेमिंग यांनी म्हटलं आहे.

धोनी-फ्लेमिंग जोडगोळीच्या नेतृत्वात चेन्नईने १२ वेळा प्लेऑफ्स गाठण्याचा विक्रम केला. दहावेळा फायनलमध्ये खेळण्याचा विक्रमही नावावर केला. फ्लेमिंग हे आम्हाला घरच्यासारखे आहेत. चेन्नईच्या वाटचालीचा ते अविभाज्य घटक आहेत. त्यांची उणीव नक्कीच भासेल असं चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी सांगितलं.

चाळिशी पार केलेल्या महेंद्रसिंग धोनीने काही वर्षांपूर्वी कर्णधारपद सोडलं. ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली. यंदाच्या हंगामात धोनी संघाचा भाग होता. मात्र हंगाम सुरू होण्याच्या काही तास आधी त्याच्या दुखापतीची बातमी आली. त्यातून सावरत तो खेळेल अशी आशा वर्तवण्यात आली होती. मात्र दुखापत गंभीर असल्याने त्याचं खेळणं लांबणीवर गेलं. धोनी न खेळताच चेन्नईचा यंदाच्या हंगामातला प्रवास संपला. अलीकडे प्रत्येक हंगामात धोनी निवृत्त होणार का अशा चर्चा रंगतात. फ्लेमिंग यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर धोनी चेन्नई सुपर किंग्सचा मेन्टॉर होऊ शकतो. मात्र यासंदर्भात संघव्यवस्थापनाने काहीही घोषणा केलेली नाही. माईक हसी आणि एरिक सिमन्स हे चेन्नईच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहेत.