नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील अलौकिक खेळाडू सचिन तेंडुलकरला पायचित ठरविण्याचा तो निर्णय चुकीचा होता अशी उपरती तो निर्णय देणारे पंच स्टीव्ह बकनर यांना तब्बल बावीस वर्षांनी झाली. दोन दशकांहून अधिक काळ जागतिक क्रिकेटमधील आदरणीय पंच म्हणून बकनर यांची ओळख होती. ते २००९ मध्ये निवृत्त झाले.

आता वेस्ट इंडिज क्रिकेट पंच संघटनेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यातील एक आठवणही तेंडलकरला बाद देण्याच्या निर्णयाविषयी होती. आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय कुठला असे या वेळी त्यांना विचारले असताना त्यांनी ब्रिस्बेनच्या मैदानावर २२ वर्षांपूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात तेंडुलकरला पायचित देण्याचा निर्णय सर्वात कठीण होता असे सांगितले.

या निर्णयाविषयी आजही बोलले जाते. तो निर्णय म्हणजे माझी चूक होती. मी त्याला का बाद दिले? तो बाद कसा? वगैरे प्रश्न त्यानंतर उपस्थित झाले. पण, आयुष्यात माणसाकडून चुका होतच राहतात आणि मी ती चूक स्वीकारली आणि पुढे चालू राहिलो, असे बकनर म्हणाले.

तेव्हा जेसन गिलेस्पीचा चेंडू पॅडच्या वर लागला होता. बकनर यांना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेली अपील पटली आणि त्यांनी त्याला बाद ठरवले. मात्र, पुन्हा पाहिल्यानंतर चेंडू यष्ट्यांच्या वरून जात होता असे स्पष्ट दिसून आले. समालोचन करणाऱ्या टोनी ग्रेगसह प्रत्येकाने हा निर्णय भयानक असल्याचे सांगितले.

बकनर यांनी तेंडुलकरला चुकीच्या पद्धतीने बाद देण्याची ही काही एकमेव घटना नाही. ईडन गार्डन्सवर २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध काहीच जणांनी अपील केल्यानंतरही तेंडुलकरला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद ठरवले होते. यानंतर बॅट आणि चेंडूंमध्ये बरेच अंतर असल्याचे दिसून आले होते.

तेंडुलकरचे मिश्कील उत्तर

सचिन तेंडुलकरला २०२४ मध्ये एका मुलाखतीत पंच बकनर यांच्याशी असलेल्या नात्याविषयी विचारण्यात आले. मी फलंदाजी करताना बकनर यांना बॉक्सिंग ग्लोव्ह्ज घालायला द्यावेत, जेणेकरुन तो बाद असल्याची खूण करू शकणार नाही, अशी मिश्कील टिप्पणी तेंडुलकरने तेव्हा केली होती.