Steve Smith Record, SA vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना डर्बनच्या मैदानावर सुरू आहे. २०१८ मध्ये झालेल्या सँडपेपर प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. पण तो २५ धावा करून माघारी परतला. तरीदेखील त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. आता या रेकॉर्डकच्या यादीत आणखी भर पडली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये स्टीव्ह वॉ ला मागे टाकलं आहे. यासह तो या रेकॉर्डमध्ये तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. आता स्टीव्ह स्मिथ या रेकॉर्डमध्ये केवळ रिकी पाँटिंग आणि ॲलन बॉर्डरच्या मागे आहे. स्टीव्ह स्मिथच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये १२६ सामन्यांमध्ये १०९४५ धावा केल्या आहेत. तर स्टीव्ह वॉ च्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये १६८ सामन्यांमध्ये १०९२७ धावा केल्या आहेत. तर अव्वल स्थानी असलेल्या रिकी पाँटिंगच्या नावे १३३७८ धावा करण्याची नोंद आहे.

ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

रिकी पाँटिंग – १३३७८ धावा
ॲलन बॉर्डर – १११७४ धावा
स्टीव्ह स्मिथ – १०९४५ धावा
स्टीव्ह वॉ – १०९२७ धावा
डेव्हिड वॉर्नर – ८७८६ धावा

ऑस्ट्रेलियाची फ्लॉप सुरुवात

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. सलामीला आलेला ट्रॅव्हिस हेड अवघ्या ९ धावांवर माघारी परतला. तर निक मॅडिसनने ३३ धावा केल्या. त्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी ६० धावा केल्या. मार्नस लाबुशेन ३७ धावा करून माघारी परतला.