AUS vs ENG Steve Smith wicket Video: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळbला जात आहे. इंग्लंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह इंग्लंडने उत्कृष्ट गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरला झटपट माघारी पाठवलं. ऑस्ट्रेलियाने ८९ धावांमध्ये ५ विकेट्स गमावल्या. संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ एका कमालीच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

इंग्लंडच्या जोश टंगने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ एकट्याने माघारी धाडला. पहिल्या डावात त्याने ५ विकेट्स घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. तर ब्रायडन कार्स, गस एटकिन्सन यांनी त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज अर्धशतकदेखील करू शकला नाही. यासह पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया १५२ धावा करत सर्वबाद झाला आहे.

इंग्लंडकडून जोश टंग २० वं षटक टाकण्यासाठी उतरला. हा दुसरा चेंडू आतल्या बाजूने स्विंग झाला, त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने पुढे येऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण स्मिथ मात्र हा फटका खेळण्यात चुकला आणि स्मिथला काही कळण्याआधीच तो क्लीन बोल्ड झाला होता. चेंडूची लाईन आणि लेंग्थ पाहून तो पूर्णपणे थक्क झाला होता. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जोश टंगने या सामन्यात भेदक गोलंदाजी केली आहे. त्याने ११.२ षटकांत ४५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. टंगने जेक वेदरलड, मार्नस लबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मायकेल नेसर व स्कॉट बोलँड या खेळाडूंना बाद केलं. यापैकी स्टीव्ह स्मिथला त्याने टाकलेला चेंडू कमालीचा होता. एटकिन्सनने हेडला क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला आणि इथूनच ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स पडायला सुरूवात झाली.

चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड आणि जॅक वेदरल्ड यांनी डावाची सुरुवात केली. संपूर्ण मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या हेडला एटकिन्सनने १२ धावांवर क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर जॅक्स १० धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाला मार्नस लाबुशेन (६) आणि स्टीव्ह स्मिथ (९) यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण दोन्ही खेळाडू लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यामुळे पुढच्या फलंदाजांवर दबाव वाढला. उस्मान ख्वाजाने २९ धावांचे योगदान दिलं.

ख्वाजा आणि कॅरेमध्ये भागीदारी होत असताना गस एटकिन्सने ख्वाजाला झेलबाद करत संघाला पुन्हा एक ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्यानंतर स्टोक्सने गेल्या सामन्यातील शतकवीर कॅरेला झेलबाद केलं. यानंतर कॅमेरून ग्रीन व मायकेल नेसर यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला १०० पार नेलं. पण ब्रायडन कार्सने ग्रीनला धावबाद करत ही भागीदारी तोडली. पण मायकेल नेसर मात्र मैदानावर कायम होता. यानंतर टंगने त्याला क्लीन बोल्ड करत माघारी धाडलं त्यानंतर गोलंदाजांच्या लागोपाठ विकेट्स पडल्या.