Steve Smith Most Catches Record: बांगलादेशचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना डार्विनमध्ये सुरु आहे. या कसोटी सामन्यात बांगलादेशचा दबदबा पाहायला मिळाला आहे. पहिल्याच दिवशी बांगलादेशच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला १९८ धावांवर ऑलआऊट केलं. यादरम्यान स्टीव्ह स्मिथ एकटा लढला. स्मिथने ७१ धावांची खेळी करुन संघाची धावसंख्या १५० धावांच्या पार पोहोचवली. फलंदाजीत दमदार कामगिरी केल्यानंतर आता क्षेत्ररक्षण करतानाही त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

स्टीव्ह स्मिथ अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणही तितकंच महत्वाचं असतं. संघात असे खेळाडू असायला हवे, ज्यांच्या हातात झेल गेला की तो सुटत नसतो. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथ देखील त्याच खेळाडूंपैकी एक आहे. स्मिथने स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना एकापेक्षा एक भन्नाट झेल घेतले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना त्याने स्लीपमध्ये ३ भन्नाट झेल घेतले. यादरम्यान लिटन दासचा झेल घेताच त्याने कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. स्टीव्ह स्मिथ हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत सयुंत्करित्या अव्वल स्थानी पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने दिग्गज खेळाडू जो रुटच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा रेकॉर्ड हा इंग्लंडच्या जो रुटच्या नावे आहे. रुटने १६६ कसोटी सामन्यांमध्ये २१८ झेल घेतले आहेत. दरम्यान स्टीव्ह स्मिथने आता या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. स्मिथच्या नावे अवघ्या १२४ कसोटी सामन्यांमध्ये २१८ झेल घेण्याची नोंद आहे. या रेकॉर्डमध्ये तो रुटला मागे टाकून आणखी पुढे निघू शकतो. या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या राहुल द्रविडच्या नावे १६४ कसोटी सामन्यांमध्ये २१० झेल घेण्याची नोंद आहे. तर चौथ्या स्थानी असलेल्या महेला जयवर्धनेच्या नावे १४९ सामन्यांमध्ये २०५ झेल घेण्याची नोंद आहे. तर या यादीत पाचव्या स्थानी असलेल्या जॅक कॅलिसच्या नावे १६६ कसोटी सामन्यांमध्ये २०० झेल घेण्याची नोंद आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू

स्टीव्ह स्मिथ – १२४ सामने, २१८ झेल
जो रुट- १६६ सामने, २१८ झेल
राहुल द्रविड- १६४ सामने, २१० झेल
महेला जयवर्धने- १४९ सामने , २०५ झेल
जॅक कॅलिस- १६६ सामने, २०० झेल