‘आम्ही क्रिकेट खेळू लागलो तेव्हा आमच्या पिढीसाठी सचिन तेंडुलकर हाच आदर्श होता. खरंतर कोणत्याही क्रिकेटवेड्या देशात सचिन हे दैवत होतं’, आहे असं अजिंक्य रहाणे सांगत होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ याच्याशी ‘द चॅम्पियन माइंडसेट’ या पॉडकास्टमध्ये अजिंक्य वॉ याच्याशी बोलत होता. यावेळी स्टीव वॉने अजिंक्यला एक गुगली टाकला.
काही दिवसांपूर्वीच अजिंक्यने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसंच आयपीएलला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज असलेल्या अजिंक्यने ८५ टेस्ट, ९० वनडे आणि २० टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. अजिंक्यच्या नेतृत्वातच २०२०-२१ मध्ये दुखापतींनी जर्जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच चीतपट करण्याची किमया केली.
कसोटी क्रिकेटमध्ये माझा सगळ्यात आवडता बॅटिंग साथीदार अशा शब्दात विराटने अजिंक्यच्या निवृत्तीनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. शांत, संयमी आणि कृतीतून उत्तर देणाऱ्या अजिंक्यने भारतीय संघात मुंबई क्रिकेटची मशाल तेवत ठेवली.
अजिंक्य स्टीव वॉची मुलाखत घेत होता. त्यादरम्यान वॉने त्याला थांबवत, मला एक प्रश्न विचारायचा आहे असं म्हटलं. वॉ म्हणाला, ‘जेव्हा मी तुला फलंदाजी करताना पाहिलं, त्यावेळी मनात विचार आला की हा सचिनसारखी फलंदाजी करतो. मोठं होत असताना सचिन हाच तुझा आदर्श होता का? त्याच्याप्रमाणे तूही हायबॅकलिफ्टने खेळतोस. तंत्रशुद्ध फलंदाजी हे तुम्हा दोघांचं वैशिष्ट्य आहे. चेंडू खेळताना तुमचं शरीर अतिशय संतुलित स्थितीत असतं’.
यावर अजिंक्य म्हणाला, ‘आम्ही लहानाचो मोठे झालो तेव्हा सचिन हाच परवलीचा शब्द होता. देश कुठलाही असो, त्या काळातल्या प्रत्येकासाठी सचिन हाच मापदंड होता. मुंबईतल्या मैदानांवर मी क्रिकेटचे बारकावे शिकलो. सचिन खेळला त्याच वानखेडे मैदानावर मीही खेळलो. मित्रांबरोबर खेळत असताना मी त्याच्याप्रमाणे खेळायचा प्रयत्न करत असे. हाय बॅकलिफ्ट, सचिनप्रमाणे स्ट्रेट ड्राईव्ह मारायला मला आवडत असे. ठेवणीतल्या अशा खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हची भुरळ न पडती तरच नवल. सचिनला खेळताना पाहणं हा अतिशय समृद्ध करणारा अनुभव असे. नशिबाने आधी मुंबईसाठी आणि नंतर भारतीय संघात मला त्याच्याबरोबर खेळायचीही संधी मिळाली. ते क्षण मंतरलेले आहेत. त्याच्याकडून असंख्य गोष्टी शिकलो’.
अजिंक्यचं बोलणं संपतोय तोच स्टी वॉने गुगली टाकला. सचिनइतकेच तूही पैसे कमावलेस का? असा गंमतीशीर प्रश्न वॉने अजिंक्यला विचारला. मी कदाचित आता पैसे कमावू शकेन असं अजिंक्यने सांगितलं. निवृत्तीनंतर पॅनेलिस्ट म्हणून कार्यरत अजिंक्य युरोपियन टी२० लीगमध्ये सहभागी झाला. या लीगमधील एका संघाचा वॉ सहमालक आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने तीन माजी कर्णधारांचा गौरव केला. दिवंगत माधव मंत्री, अजिंक्य रहाणे आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावे वानखेडे स्टेडियमवर लाऊंज असणार आहे.
