खरा वारसदार!

ऑस्ट्रेलियाच्या मातीत नेमके काय दडले आहे, हे गूढ, अनाकलनीय, आश्चर्यचकित करणारे आहे. त्यांना प्रत्येक वेळेला काळाला अनुसरून क्रिकेटपटू आणि कर्णधार मिळत गेले आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर नेहमीच संघाला अव्वल स्थानी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.

नवे नायक!
काही वर्षांपूर्वी विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ हे कसोटी क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवू शकतील, असे म्हटले असते तर कुणाचाही विश्वास बसला नसता. सध्याचे वेगवान क्रिकेट ज्ञात असलेले हे दोन कर्णधार बोर्डर-गावस्कर चषक मालिकेत ‘नवे नायक’ म्हणून उदयाला आले. महेंद्रसिंग धोनीने अचानक निवृत्ती पत्करल्यामुळे कोहलीकडे तर मायकेल क्लार्कच्या निवृत्तीमुळे स्मिथकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. पण या दोघांनीही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत फलंदाजीच्या तेजाने मालिकेवर छाप पाडली.

ऑस्ट्रेलियाच्या मातीत नेमके काय दडले आहे, हे गूढ, अनाकलनीय, आश्चर्यचकित करणारे आहे. त्यांना प्रत्येक वेळेला काळाला अनुसरून क्रिकेटपटू आणि कर्णधार मिळत गेले आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर नेहमीच संघाला अव्वल स्थानी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. इयान चॅपेलपासून ते थेट मार्क टेलर असो आणि त्यानंतरचे स्टिव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग, मायकेल क्लार्क आणि आता भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत कर्णधारपद भूषवणारा स्टिव्हन स्मिथ. काही वर्षांपूर्वी स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होऊ शकतो, याचा कुणीही विचार केला नसेल. पण त्याने समर्थपणे ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले आणि विजयामध्ये मोलाचा वाटाही उचलला.
स्मिथ जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला तेव्हा त्याच्यावर ‘ट्वेन्टी-२०’चा खेळाडू असा शिक्का मारला होता. कारण त्या वेळी हवेत फटके मारूनच मोठी धावसंख्या होते, असे त्याला वाटत असावे. पण त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंपासून तो बरेच काही शिकत गेला. आक्रमकपणा तर रक्तातच होता, पण त्याला संयतपणाची जोड मिळाली, त्यानंतर संयमही राखायला तो शिकला आणि आता थेट तो ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व समर्थपणे करू लागला आहे.
२००८मध्ये न्यू साऊथ वेल्सकडून खेळत असताना वेगवान गोलंदाज रायन हॅरीसला वाटले होते, की १८ वर्षीय स्मिथमध्ये कर्णधार होण्याची क्षमता आहे. या संघातील हॅरीस सर्वात अनुभवी खेळाडू होता, तेव्हा त्यांचे प्रशिक्षक ब्रायन यांनी हॅरीसला सांगितले होते की, ‘‘फिल ह्य़ुज आणि स्मिथ हे दोघे ऑस्ट्रेलियासाठी खेळतील, तर स्मिथकडे कर्णधार होण्याचे गुण आहेत.’’ त्यानंतर जानेवारी २०११ मध्ये क्लार्कने एक ट्विट केले होते, त्यामध्ये त्याने स्मिथसाठी एक दिवस नक्कीच राखून ठेवा, तो अ‍ॅलन बोर्डर पुरस्काराचा मानकरी ठरेल,’’ असे म्हटले होते. याच वर्षी त्याला सावरणारी डॅनियल विलिस नावाची मैत्रीण भेटली, जिने स्मिथच्या कारकीर्दीमध्ये मोलाचा वाटा उचलला. तिने स्मिथला एक खेळाडू आणि एक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न केला. २०१४ या वर्षांच्या सुरुवातीला त्याला अ‍ॅलन बोर्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि वर्षअखेरीस कर्णधारपदाची माळ गळ्यात पडली.
क्लार्कला दुखापतींनी हैराण केले होते, पण ह्य़ुजला श्रद्धांजली वाहण्यासाठी तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळला. पण दुसऱ्या सामन्यासाठी मात्र तो संघासाठी उपलब्ध नव्हता. त्या वेळी कर्णधार कोणाला करायचे, हा ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीपुढे मोठा प्रश्न होता. यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिन अनुभवी असल्याने त्याच्या नावाची जोरदार चर्चा होती, पण भविष्याची पावले ओळखत स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आणि त्याने या संधीचे सोने केले. या मालिकेत सलग चार शतके लगावत तो सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तीत जाऊन बसला. मालिकेत तब्बल ७६९ धावांची त्याने बरसात केली, ती १२८.१६च्या सरासरीने. यामध्ये चार शतके आणि दोन अर्धशतके लगावली. कर्णधारपद मिळाल्यावर स्मिथ अधिक जबाबदारीने खेळला. कर्णधाराने संघापुढे कसा आदर्श ठेवायला हवा, याचा उत्तम वस्तुपाठ त्याने दाखवून दिला. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता येत नव्हती तेव्हा त्याने १३३ दमदार खेळी साकारली आणि संघापुढे उत्तम उदाहरण ठेवले. त्यानंतरच्या सामन्यात १९२ अप्रतिम खेळी आणि चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा शतक.

एक कर्णधार म्हणूनही त्याची रणनीती नेहमीच ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडली. दुसऱ्या कसोटी सामन्यात पाटा खेळपट्टीवर त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजांना वापरले ते नक्कीच कौतुकास्पद होते. रायन हॅरीस, मिचेल जॉन्सन संघात असो किंवा नसो, त्याला कसलाच फरक पडला नाही. त्याने वैविध्य असलेले गोलंदाज निवडले, नॅथन लिऑनसारख्या फिरकीपटूवर विश्वास टाकला. शेन वॉटसन आणि ब्रॅड हॅडिनसारख्या वयाने आणि अनुभवाने मोठय़ा असलेल्या क्रिकेटपटूंना सोबत घेऊन खेळला. तिसऱ्या सामन्यात त्याच्यावर बचावात्मक असल्याची टीका करण्यात आली होती. दुसरा डाव त्याने फार उशिरा घोषित केल्याचे म्हटले गेले, पण ही चूक त्याने लगेचच चौथ्या कसोटीत सुधारली आणि पाचव्या दिवशी भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले, यालाच ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराची आक्रमकता म्हटली जाते. त्याच्याऐवजी दुसऱ्या एका कर्णधाराने काही षटके खेळून काढली असती पण त्याने सामन्यातील रंजकता वाढवली आणि भारतालाही एक कठीण संधी दिली. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना रंगला, जर अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमार खेळपट्टीवर ठाण मांडून उभे राहिले नसते तर ऑस्ट्रेलियाला विजय मिळाला
असता.
क्लार्कनंतर ऑस्ट्रेलियाचे काय होणार, कोण समर्थपणे कर्णधारपद भूषवणार, याचे चोख उत्तर स्मिथने आपल्या कामगिरीच्या जोरावर दिलेच आहे. क्लार्क दुखापतीतून सावरल्यावर किती क्रिकेट खेळेल याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पण सध्या तरी ऑस्ट्रेलियाचे भवितव्य स्मिथच्या हातात सुरक्षित आहे. बोर्डर-गावस्कर चषक मालिकेचे हे देणे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
प्रसाद लाड

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Steven smith a real inheritor of steve waugh and ricky ponting

ताज्या बातम्या