बेशिस्त वर्तन करणारा दक्षिण आफ्रिकेचा द्रुतगती गोलंदाज कॅगिसो रबाडावरील बंदीचा निर्णय मागे घेणे अयोग्य आहे, असे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने सांगितले.

दुसऱ्या कसोटीत स्मिथला बाद केल्यानंतर रबाडाने त्याच्या खांद्याला हेतूपूर्वक धक्का दिला होता. त्याबाबत स्मिथने पंचांकडे तक्रार केल्यानंतर पंचांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे याबाबत आपला अहवाल पाठवला होता. त्याच्या आधारे रबाडावर दोन कसोटी सामन्यांकरिता बंदीही घालण्यात आली होती. मात्र याबाबत रबाडाने त्याची दाद मागितली. त्यावर न्यायालयीन समितीचे प्रमुख मायकेल हिरोन यांनी रबाडाने खूप मोठा गुन्हा केला नसल्याचा निर्वाळा दिला. रबाडावर बंदी घालण्याचा निर्णय अयोग्य असून त्याला केवळ ताकीद द्यावी असे त्यांनी सांगितले.

दरम्यान स्मिथ, तसेच त्याचे सहकारी नाथन लियान व डेव्हिड वॉर्नर यांनी तिसऱ्या कसोटीसाठी नियुक्त केलेले सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याशी येथे चर्चा केली. पायक्रॉफ्ट यांनी आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिस याच्याबरोबर चर्चा केली असून, सामन्यात कटू प्रसंग ओढवणार नाही याबाबत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.