अटीतटीच्या लढतीत एव्हर्टनवर ४-३ अशी मात

मार्को अरुनौटोव्हिकने भरपाई वेळेत पेनल्टीद्वारे केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर स्टोक सिटीने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत एव्हर्टनला पराभवाचा धक्का दिला.

सामन्याच्या १५व्या मिनिटाला झेहद्रान शाक्विरीने स्टोक सिटीतर्फे गोल केला. स्वित्र्झलडचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या झेहद्रानचा स्टोक सिटीसाठी खेळताना पहिलाच गोल ठरला. काही मिनिटांकच रोमेल्यू ल्युकाकूने एव्हर्टनकडून सलामीचा गोल केला. जेम्स मॅक्कार्थीने दिलेल्या सुरेख पासचा उपयोग करुन घेत ल्युकाकूने हा गोल केला. मध्यंतराला अवघी काही मिनिटे बाकी असताना शाक्विरीने हाफ व्हॉलीद्वारे अफलातून गोलची नोंद केली. प्रीमिअर लीगच्या यंदाच्या हंगामातल्या सर्वोत्तम गोलसाठी शिफारश होईल अशा या गोलने स्टोक सिटीला आघाडी मिळवून दिली. शाक्विरीला प्रत्युत्तर देत मध्यातूनच चेंडूवर नियंत्रण मिळवत ल्यूकाकूने दिमाखदार गोल करत एव्हर्टनला बरोबरी करुन दिली.

गेरार्ड डय़ुलेफ्यूने गोलपोस्टच्या अगदी जवळून केलेल्या गोलच्या बळावर एव्हर्टनने आघाडी मिळवली. काही मिनिटांतच स्टोक सिटीचा बदली खेळाडू जोसेल्यूने गोल करत बरोबरी करुन दिली. बरोबरीची कोंडी कायम राहणार असे चित्र असताना भरपाई वेळेत मार्को अरुनौटोव्हिकने निर्णायक गोल करत स्टोक सिटीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

घरच्या मैदानावर एव्हर्टनचा दुसरा पराभव आहे. या पराभवामुळे युरोपियन लीगसाठी पात्र ठरण्याची शक्यता धुसर झाली आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी मँचेस्टर युनायटेडला नमवण्याची किमया करणाऱ्या स्टोक सिटीने आणखी एका दमदार विजयाची नोंद केली. या विजयासह स्टोक सिटीने गुणतालिकेत आठव्या स्थानी आगेकूच केली आहे.