Nitish Rana Wicket: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना दिल्लीला अवघ्या १५५ धावा करता आल्या. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्स संघाने सहज पूर्ण केलं आणि विजयाची नोंद केली. धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने दमदार अर्धशतकी खेळी केली. पण पहिल्या डावात नितीश राणाची विकेट तुफान चर्चेत राहिली. ज्या पद्धतीने तो बाद झाला, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
ज्या सामन्यात केएल राहुलने १५० धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात नितीश राणाकडेही शतक झळकावण्याची संधी होती. पण तो बाद झाला होता. आता चेन्नईविरुद्ध खेळताना दिल्लीचा संघ अडचणीत असताना देखील नितीश राणाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो अवघ्या १५ धावा करून बाद झाला. त्याला नूर अहमदने बाद करत माघारी धाडलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात नितीश राणा एकाच चेंडूवर दोन वेळा बाद झाल्याचं दिसून येत आहे.
तर झाले असे की, चेन्नईकडून नूर अहमद गोलंदाजीला आला. त्याच्या गोलंदाजीवर नितीश राणाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू हवेत गेला आणि कार्तिक शर्माने सोपा झेल घेतला. ज्यावेळी चेंडू हवेत गेला त्यावेळी त्याचा पाय स्टंपला लागला आणि बेल्स खाली पडली. त्यामुळे तो एकाच चेंडूवर २ वेळा बाद झाला. त्यामुळे एकाच चेंडूवर २ वेळा बाद झाल्यामुळे नितीश राणा तुफान चर्चेत आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला, कारण दिल्लीच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. पथूम निसांका, केएल राहुल आणि नितीश राणासारखे फलंदाज फ्लॉप ठरले. शेवटी ट्रिस्टन स्टब्सने ३८ आणि समीर रिझवीने ४० धावांची खेळी करून संघाची धावसंख्या १५५ धावांवर पोहोचवली. चेन्नईला हा सामना जिंकण्यासाठी १५६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून संजू सॅमसनने नाबाद ८७ धावा केल्या. तर त्याला चांगली साथ देत कार्तिक शर्माने नाबाद ४१ धावांची खेळी करून चेन्नईला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.
