पीटीआय, लंडन : षटकांच्या संथगतीचे वाढते प्रमाण लक्षात घेता क्रिकेटचे नियम बनविणाऱ्या मेरिलीबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पंच आढावा प्रक्रिया म्हणजेच ‘डीआरएस’ घेण्याच्या पद्धतीत आणि खेळाडूंच्या वेळकाढूपणावर अंकुश ठेवण्याची सूचना केली आहे. 

‘एमसीसी’च्या माइक गॅटिंग यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय जागतिक क्रिकेट समितीने न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात जून महिन्यात झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सामने पाहिल्यानंतर ही सूचना केली आहे. या कसोटी मालिकेदरम्यान प्रत्येक दिवशी बराच वेळ निर्थक कारणाने वाया गेल्याचा निष्कर्ष या समितीने काढला. ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीही या समितीत आहे.

‘डीआरएस’च्या कार्यपद्धतीत सुटसुटीतपणा हवा, यावर ‘एमसीसी’ने कटाक्ष टाकला आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड कसोटी सामन्यांच्या मालिकेत ‘डीआरएस’मध्ये ६४ मिनिटे वाया गेल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहेत. खेळाडूंमध्ये चर्चा करण्यात सहा मिनिटे, खेळाडूंनी ‘डीआरएस’ घेतल्यावर ४७ मिनिटे आणि पंचांनी केलेल्या मागणीत ११ मिनिटे वाया गेल्याचे ‘एमसीसी’ने म्हटले आहे. त्यामुळे ‘डीआरएस’चा निर्णय पूर्ण झाल्यावर गोलंदाजाने पुढचा चेंडू टाकण्यासाठी सरासरी २५ सेकंद वेळ गेला. थोडक्यात प्रत्येक दिवशी ‘डीआरएस’ घेण्यात सरासरी चार मिनिटांचा वेळ गेला, असे या क्रिकेट समितीचे म्हणणे पडले आहे.

‘‘षटकांचा वेग कमी राखल्याबद्दल आम्ही कर्णधार आणि संघावर आर्थिक दंडाची तरतूद केली आहे. पण, त्याचा अपेक्षित परिणाम झालेला नाही. षटकांचा वेग कमीच दिसून येत आहे,’’ असे समितीचे गॅटिंग यांनी म्हटले आहे.

‘एमसीसी’च्या सूचना

  • राखीव खेळाडूंनी ग्लोव्ह्ज आणि पाणी घेऊन मैदानावर किती वेळा यावे, हे निश्चित करावे
  • ‘डीआरएस’ घेतल्यावर गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असावा
  • दाद फेटाळल्यास फलंदाजांनेही लगेच तयार असायला हवे
  • खेळाचा वेग कायम राखण्यासाठी पंच आणि सामना निरीक्षक आग्रही