पाकिस्तान संघ आणि वादविवाद हे जुनं सख्य आहे. पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. हेडिंग्लेपाठोपाठ लॉर्ड्स कसोटीतही त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक दुखापतग्रस्त झाला. इमाम दुखापतग्रस्त असल्याने दुसऱ्या डावात खेळायला उतरला नाही. या दुखापतीवरून वादाला तोंड फुटलं आहे. इंग्लंडचा माजी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने सूचक शब्दात इमामची दुखापत म्हणजे नाटक असल्याचं म्हटलं आहे.

इमामच्या पोटऱ्यांना दुखापत झाल्याने दुसऱ्या डावात तो खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. इंग्लंडच्या पहिल्या डावात इमानने दोन झेल सोडले होते. दुखापत असतानाही चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी सराव करताना दिसला. त्याबाबत इंग्लंडचा माजी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला, ‘त्याचं जे चाललंय ते आपण टीव्हीवर बघतोय. झेल सोडल्यानंतर तसंच दुखापतीबाबत प्रसारमाध्यमांनी त्याला धारेवर धरलं. तो हा सराव इन्डोअर करू शकला असता. शॉर्ट्स परिधान करून, पायाला टेप लावून, लंगडत थ्रोडाऊन्सवर सराव करण्याची काहीच गरज नव्हती. मला हे अजिबातच आवडलं नाही’.

इमामच्या दुखापतीबाबत पाकिस्तानचे माजी फलंदाज आणि निवडसमिती सदस्य मोहम्मद वासिम यांनी भाष्य केलं होतं. खेळायला लागू नये म्हणून इमामने खोटी दुखापत असल्याचं भासवलं असा आरोप वासिम यांनी केला होता.

२०२२ मध्ये पाकिस्तानच्या फिजिओथेरपिस्टने वासिम यांना इशारा दिला होता. ‘इमामला झालेली दुखापत वादाचा मुद्दा होऊ शकतो असं त्याने सांगितलं होतं. यासंदर्भात अधिकृत घोषणा झाली नव्हती’, असं वासिम म्हणाले. ‘याआधीही इमामसंदर्भात हा मुद्दा उपस्थित झाला आहे. काही प्रशिक्षकांनीही हा मुद्दा मांडला होता ‘,असं वासिम म्हणाले.

लॉर्ड्स कसोटीत इमामला दुखापत झाल्यानंतर पुन्हा एकदा जुनी चर्चा समोर आली आहे. पाकिस्तान संघव्यवस्थापनाने मात्र इमामच्या पोटऱ्यांना दुखापत झाल्यामुळे तो फलंदाजीसाठी उपलब्ध नसेल असं स्पष्ट केलं.

आघाडीच्या फलंदाजांपैकी एक उपलब्ध नसल्याचा फटका पाकिस्तानला बसला. लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला ३८९ धावांचं लक्ष्य मिळालं होतं. पाकिस्तानची अवस्था १४/३ अशी झाली होती. सौद शकील आणि शान मसूद यांनी भागीदारी रचत मोठा पराभव टाळला. ही जोडी फुटताच पाकिस्तानची भंबेरी उडाली. ओली रॉबिन्सन, जोफ्रा आर्चर आणि जोश टंग या त्रिकुटासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. सौद शकीलने ९७ धावांची एकाकी झुंज दिली. तिसऱ्या आणि अंतिम कसोटीत इमाम खेळणार का याविषयीही साशंकता आहे.