Sujeet Kalkal Asian Games 2026 Wrestling Gold Medal Match: सुजीत कलकलने कुस्तीच्या आखाड्यात भारतासाठी अनपेक्षित सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात त्याने ताजिकिस्तानच्या अब्दुलमजीद कुडिएववर १०-९ असा रोमांचक विजय मिळवला. सुरूवातीला २-९ पिछाडीवर असलेल्या सुजीत अखेरच्या सेकंदांमध्ये विजय खेचून आणला. हा नवा सुवर्णपदक विजेता सुजीत कलकल कोण आहे, जाणून घेऊया.
सुजीत कलकल अंतिम सामन्यात एका क्षणी २-९ असा पिछाडीवर होता. मात्र दुसऱ्या फेरीत त्याने जबरदस्त पुनरागमन करत सामना आपल्या बाजूने फिरवला. सामना संपण्यासाठी १ मिनिट १५ सेकंद बाकी असताना तो ६-९ असा पिछाडीवर होता. त्यानंतर टेकडाउन करत त्याने ही पिछाडी ८-९ अशी कमी केली. सामना संपण्यासाठी अवघे ५० सेकंद बाकी असताना सुजीत रौप्यपदकाच्या दिशेने जात असल्याचं दिसत होतं. मात्र त्याने पुन्हा एकदा टेकडाउन करत निर्णायक गुण मिळवला आणि १०-९ असा विजय मिळवत अविस्मरणीय सुवर्णपदक पटकावलं.
विशेष म्हणजे, याच ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनिया आणि योगेश्वर दत्त यांनी यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. योगेश्वरने २०१४मध्ये, तर बजरंगने २०१८मध्ये याच वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं होतं. बजरंगने टोकियो ऑलिम्पिकमध्येही ६५ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं होतं
कोण आहे सुजीत कलकल?
हरियाणातील इमलोटा गावातील एका साध्या आखाड्यातून सुरुवात करणारा सुजीत कलकल आज जगातील अव्वल कुस्तीपटूंच्या पंक्तीत पोहोचला आहे.भारतीय कुस्तीपटू सुजीत कलकल प्रामुख्याने पुरुषांच्या फ्रीस्टाइल ६५ किलो वजनी गटात खेळतो. या वजनी गटाला भारताच्या कुस्तीमध्ये मोठा इतिहास आहे. टोकियो ऑलिम्पिक पदकविजेता बजरंग पुनिया याच गटात खेळला होता. सुजीतने अंडर-२३ विश्वविजेतेपद आणि वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावलं आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने ऑलिम्पिक आणि जागतिक पदकविजेत्या कुस्तीपटूंनाही पराभूत केलं असून, तो भारताच्या आघाडीच्या कुस्तीपटूंमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. सुजीतचा हा प्रवास वेगवान असला तरी तो अजिबात सोपा नव्हता. ५ नोव्हेंबर २००२ रोजी जन्मलेला सुजीत हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील इमलोटा गावचा आहे. कुस्ती त्याच्या कुटुंबासाठी नवी नव्हती. त्याचे वडील दयानंद कलकल यांनी राष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळली होती. त्यांनीच सुजीतला या खेळात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
सुजीतने इमलोटा येथील स्थानिक आखाड्यात कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. तिथे प्रशिक्षणाची साधनं मर्यादित होती आणि अनुभवी प्रशिक्षकांचाही फारसा सहवास मिळत नव्हता. २०२०पर्यंत सुजीतने इमलोटामध्येच प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर २०२१मध्ये तो सोनीपतला गेला. तिथे आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव असलेल्या कुस्तीपटूंसह प्रशिक्षण घेतल्याने त्याच्या खेळाच्या विकासाला वेग मिळाला. यानंतर त्याच्या कामगिरीतही सातत्याने सुधारणा दिसून आली.
२०२२मध्ये बिश्केक, किर्गिस्तान येथे झालेल्या अंडर-२३ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुजीतने सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर काही आठवड्यांतच मनामा, बहरीन येथे झालेल्या अंडर-२० आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावलं. त्याच वर्षी जुलैमध्ये ट्युनिस, ट्युनिशिया येथे झालेली वरिष्ठ रँकिंग सीरिज स्पर्धाही त्याने जिंकली.
