सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताला मलेशिया विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात मलेशियाने भारतावर १-० अशी मात केली. या पराभवासह भारताच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. खेळ संपण्यासाठी अवघ्या १० मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना मलेशियाने एकमेव गोल करून भारताला पराभूत केले. पेनल्टी कॉर्नरवरून मलेशियाने हा गोल नोंदवला. संपूर्ण सामन्यात भारताचा संघ गोल करण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळाला.

 

भारताचे आक्रमण आणि बचाव फळी देखील यावेळी विस्कटली होती. या सामन्याआधी भारत चार सामन्यांत सात गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होता. ब्रिटनच्या खात्यात देखील समान गुण आहेत, पण भारतीय संघ गोलच्या संख्येवरून पिछाडीवर आहे. त्यामुळे शनिवारी अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन यांच्यात चुरस रंगेल. तर भारतीय संघ कांस्य पदकासाठी न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जाईल.