सुलतान अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने पुन्हा एकदा अखेरच्या क्षणांमध्ये हाराकिरी केली. पेनल्टी शूटआऊटवर दक्षिण कोरियाने भारतावर 4-2 ने मात करत स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. निर्धारीत वेळेत दोन्ही संघानी 1-1 अशी बरोबरी साधली होती. 2010 साली दोन्ही संघ याच स्पर्धेत समोरासमोर आले होते. मात्र त्यावेळी पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे दोन्ही संघाना विजेतेपद विभागून दिलं होतं.

नवव्या मिनीटाला भारताकडून सिमरनजीत सिंहने गोल करत खातं उघडलं. सुरुवातीच्याच सत्रात पिछाडीवर पडलेल्या कोरियाने यानंतर सामन्यात बचावात्मक पवित्रा आजमवला. यानंतर तिसऱ्या सत्रापर्यंत दोन्ही संघाना गोल करण्याची संधी आली, मात्र दोघांनाही यामध्ये अपयशाचा सामना करावा लागला. चौथ्या सत्रात कोरियाला पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला, याचा फायदा घेत कोरियाने सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.

यानंतर पेनल्टी शूटआऊटसाठी भारताने श्रीजेशऐवजी क्रिशन बहादूर पाठकला गोलपोस्टवर संधी दिली. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी हाराकिरी करत सामना कोरियाला बहाल केला. पहिल्या संधीपासून आघाडी घेत कोरियाने भारताला बॅकफूटवर ढकललं. अखेरीस 4-2 च्या फरकाने बाजी मारत कोरियाने स्पर्धेत बाजी मारली.