Sunday special cricket women cricket Bowler Goswami retirement ysh 95 | Loksatta

रविवार विशेष : झुलनपर्वाची अखेर!

‘‘मी आज जे काही आहे, ते केवळ क्रिकेटमुळेच आहे. सामान्य घरातून आणि चकदासारख्या लहान गावातून असल्याने मला महिला क्रिकेटविषयी काहीच माहिती नव्हती.

रविवार विशेष : झुलनपर्वाची अखेर!
भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी

संदीप कदम

‘‘मी आज जे काही आहे, ते केवळ क्रिकेटमुळेच आहे. सामान्य घरातून आणि चकदासारख्या लहान गावातून असल्याने मला महिला क्रिकेटविषयी काहीच माहिती नव्हती. मला क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य होते,’’ अशा शब्दांत भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने क्रिकेटचे आपल्या आयुष्यातील महत्त्व मांडले.

शनिवारी इंग्लंडविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना झुलनच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना होता. महिला क्रिकेटला नावलौकिक मिळवून देण्यात झुलनचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महिला क्रिकेटमध्ये दोन पिढय़ांची साक्षीदार असलेल्या झुलनचा प्रवास सोपा नव्हता, पण तिने कधीही हार मानली नाही. सचिन तेंडुलकरला घरचे मैदान असलेल्या वानखेडेवर हजारो-लाखो चाहत्यांच्या साक्षीने क्रिकेटला अलविदा करण्याची संधी मिळाली होती. झुलनला घरच्या मैदानावर नसले, तरीही क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर अखेरचा सामना खेळण्याचे भाग्य मिळाले. झुलनसारख्या खेळाडू एका पिढीतून एकदाच येतात, असे रोहित शर्माने अलीकडेच म्हटले होते. रोहितच्या या वक्तव्यावरूनच आपल्याला झुलनची महानता समजून येते.

‘‘मी जेव्हा खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा मी इथवर पोहोचेन याचा विचारही केला नव्हता. त्यावेळी आम्ही भारतीय महिला क्रिकेट संघटनेअंतर्गत सामने खेळायचो आणि २००६ पासून आम्ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आधिपत्याखाली आलो. मी चकदावरून सरावाकरिता जाण्यासाठी एकेरी अडीच तासांचा वेळ लागायचा, पण मी कधीही सराव चुकवला नाही. ज्यावेळी प्रथम भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, तो माझ्यासाठी संस्मरणीय दिवस होता. कर्णधाराकडून (अंजूम चोप्रा) भारताची टोपी मिळणे आणि कारकीर्दीतील पहिले षटक टाकणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता,’’ असे झुलन म्हणाली. लॉर्ड्सवरील सामना हा झुलनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील २०४वा सामना होता. पश्चिम बंगालच्या एका छोटय़ा गावातून आलेल्या झुलनने तब्बल २० वर्षे भारतीय गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व केले. इडन गार्डन्स येथे १९९७मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कॅथरीन फिट्झपॅट्रिकला पाहून झुलन मंत्रमुग्ध झाली होती. या सामन्यात झुलन ‘बॉल गर्ल’ होती. इथूनच झुलनचा क्रिकेटपटू बनण्याचा प्रवास सुरू झाला.

पुढे जाऊन झुलनने ‘आयसीसी’च्या वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचाही मान मिळवला. झुलनने २००२मध्ये भारतासाठी जेव्हा पहिला सामना खेळला, तेव्हा आताच्या भारतीय संघातील खेळाडू शफाली वर्मा आणि रिचा घोष यांचा जन्मही झाला नव्हता. आता महिलांसाठी इंडियन प्रीमियर लीगची योजना तयार होत आहे. तसेच आता ‘बीसीसीआय’कडून महिला क्रिकेटपटूंनाही वार्षिक करार दिले जातात आणि यासह त्यांना चांगले मानधनही मिळते. मात्र, झुलनने जेव्हा आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली, तेव्हा तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, परंतु तिने माघार घेतली नाही आणि आपल्या कामगिरीत सुधारणा करत आज महिला क्रिकेटच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन ती पोहोचली आहे.

झुलनकडून प्रेरणा घेऊन आता भारतातील अनेक मुलींनी क्रिकेटपटू होण्याचे आणि तिच्याप्रमाणे वेगवान गोलंदाजी करण्याचे स्वप्न बाळगले आहे. त्यामुळेच अलीकडच्या काळात भारतीय महिला संघाला रेणुका ठाकूर आणि मेघना सिंग यांसारख्या प्रतिभावान युवा गोलंदाज लाभल्या आहेत. त्यांच्यामुळे झुलनच्या निवृत्तीनंतरही भारतीय गोलंदाजीच्या भविष्याचे चित्र आशादायी आहे. दोन दशकांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत झुलनला अनेक विश्वचषकांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. तिचा समावेश असलेल्या भारतीय संघाने २००५ आणि २०१७च्या महिला एकदिवसीय विश्वचषकांची अंतिम फेरी गाठली होती, मात्र त्यांना शेवटचा अडथळा पार करता आला नाही. त्यामुळे निवृत्ती घेताना झुलनच्या मनात विश्वचषक स्पर्धा न जिंकण्याचे शल्य राहणार आहे.

काही महिन्यांपूर्वी मिताली राज आणि आता झुलन, या दोन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीमुळे भारतीय महिला क्रिकेटमधील एका पर्वाची खऱ्या अर्थाने अखेर झाली आहे. दोन दशकांहून अधिक काळ या दोन्ही खेळाडूंनी महिला क्रिकेटमधील अनेक स्थित्यंतरे पाहिली आणि अनेक ऐतिहासिक क्षणांच्या त्या साक्षीदार झाल्या. आता महिला क्रिकेटकडेही पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणे पाहिले जाते. आगामी काळात होणाऱ्या ‘आयपीएल’नंतर महिला क्रिकेट आणखी वेगळय़ा स्तरावर जाऊन पोहोचेल. भारतीय आणि जागतिक महिला क्रिकेटच्या या प्रगतीत झुलनचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे महिला क्रिकेटच्या इतिहासात झुलनसाठी विशेष स्थान असेल यात जराही शंका नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका : झुलनला निर्भेळ यशाची भेट!; तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर १६ धावांनी विजय

संबंधित बातम्या

६,६,६,६,६,६,६ … एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारत ऋतुराज गायकवाडने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा व्हिडीओ
कहर! फलंदाजांच्या नादात पाकिस्तानी विकेटकीपरच दोन धावा पळाला; सामन्यातील मजेदार Video होतोय Viral
BCCI selection committee: नवा ट्विस्ट! ३० हजार रुपयात घर चालवणारा होणार बीसीसीआय निवड समितीचा प्रमुख?
FIFA WC 2022: ब्रुनो फर्नांडिस ठरला विजयाचा शिल्पकार, उरुग्वेवर मात करत पोर्तुगाल राउंड १६ मध्ये दाखल
“संघ डरपोक…”, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने जस्टिन लँगरला दिले चोख प्रत्युत्तर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नीना गुप्तांचा वर्कआउट बघून व्हाल थक्क; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “ही तर सुरवात…”
बहुचर्चित ‘अवतार २’ केरळमध्ये होणार नाही रिलीज; चित्रपटगृहाच्या मालकांचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण
पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले
विश्लेषण : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला इजिप्तच्या अध्यक्षांना निमंत्रण; प्रमुख पाहुण्यांची निवड नेमकी कशी केली जाते? जाणून घ्या
पुणे: कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना मुदतवाढ; विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय