अन्वय सावंत

‘‘आम्हाला गोल करण्यासाठी पुन्हा सुनीलवर अवलंबून राहावे लागले. इतर खेळाडूंनी प्रयत्न केले; पण त्यांना यश लाभले नाही. लिस्टन, मनवीर, उदांता, आशिक आणि सहल यांसारख्या खेळाडूंकडून मला भविष्यात अधिक गोलची अपेक्षा आहे. आमच्या संघाने आता सुनील छेत्रीविना खेळायला शिकले पाहिजे,’’ असे भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅच काही दिवसांपूर्वी म्हणाले. त्यावेळी कर्णधार छेत्रीच्या दोन गोलमुळे भारताने आशिया चषक पात्रता स्पर्धेतील सलामीच्या लढतीत कंबोडियावर २-० अशी मात केली होती. छेत्रीने आपला अलौकिक स्तर कायम राखल्याचे स्टिमॅच यांना समाधान होते; पण त्याच वेळी इतर खेळाडू आपला खेळ उंचावत नसल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली. 

स्टिमॅच हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. भारतीय संघातील खेळाडूंविषयी असो अथवा अगदी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाविषयी, ते आपले मत स्पष्टपणे मांडण्यासाठी घाबरत नाहीत. स्टिमॅच यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. त्यांना करारवाढ मिळणार का, हे अद्याप निश्चित नाही. मात्र, गेल्या काही काळात त्यांनी भारतीय संघाच्या भविष्याच्या दृष्टीने बरीच सूचक विधाने केली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, कर्णधार छेत्रीला पर्याय निर्माण करण्याबाबत.

३७ वर्षीय छेत्री हा भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मानला जातो. छेत्रीने २००५ साली आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून भारताचे निम्म्याहूनही अधिक गोल छेत्रीच्या नावावर आहेत. त्याने भारताचे प्रतिनिधित्व करताना आतापर्यंत ३१ देशांविरुद्ध १२६ सामन्यांत ८४ गोल झळकावले आहेत. तसेच त्याने हंगेरीचे दिग्गज फुटबॉलपटू फेरेंक पुश्कास यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली असून आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासात केवळ चार खेळाडूंना त्याच्यापेक्षा अधिक गोल करण्यात यश आले आहे. यात ख्रिस्टियानो रोनाल्डो (११७ गोल) आणि लिओनेल मेसी (८६ गोल) या तारांकित खेळाडूंचाही समावेश आहे. परंतु, या दोघांपेक्षाही छेत्रीची गोलसरासरी अधिक आहे.

भारतीय फुटबॉलचा छेत्री नामक ध्रुवतारा आता मात्र कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यावर आहे. भारतीय संघाने गेल्या वर्षी ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेचे आठव्यांदा जेतेपद पटकावले होते आणि त्यानंतर छेत्रीने आपल्याकडे खेळाडू म्हणून आता फारसा वेळ उरलेला नसल्याचे म्हटले होते. त्याचा हा संदेश युवा खेळाडूंपर्यंत पोहोचेल आणि ते अधिक जबाबदारी घेत छेत्रीवरील भार हलका करतील अशी आशा होती. मात्र, अद्याप तरी तसे झालेले नाही. भारतीय संघाला गोलची आवश्यकता असताना छेत्रीलाच पुढाकार घ्यावा लागतो.

भारतीय संघ नुकताच आशिया चषकासाठी सलग दुसऱ्यांदा पात्र ठरला. कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या पात्रता स्पर्धेत भारताने कंबोडिया (२-०), अफगाणिस्तान (२-१) आणि हाँगकाँग (४-०) यांच्याविरुद्ध सलग तीन विजयांची नोंद केली. या तीन सामन्यांत चार गोलसह छेत्रीने भारतीय संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. कंबोडियाविरुद्धचे दोन्ही गोल छेत्रीनेच केले. तर अफगाणिस्तानविरुद्ध ८६व्या मिनिटापर्यंत भारताची गोलची पाटी कोरी होती. मात्र, छेत्रीने २५ यार्ड अंतरावरून उत्कृष्ट फ्री-किक मारत भारताचा पहिला गोल केला. त्यामुळे त्याचे भारतीय संघातील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मात्र, त्याच वेळी ‘छेत्री नसता, तर काय?’ असा प्रश्नही चाहत्यांना पडला.

भारताची १९५०-६०च्या दशकात आशियातील सर्वोत्तम फुटबॉल संघांमध्ये गणना केली जायची. भारतीय फुटबॉल संघाने १९५१ आणि १९६२च्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. तसेच १९५६च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने चौथे स्थान मिळवले होते. त्यांना १९६४च्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावण्यातही यश आले होते. त्यानंतर मात्र भारतीय फुटबॉलचा आलेख खालावत गेला. दरम्यानच्या काळात भारताला बायचुंग भूतिया आणि छेत्रीसारखे प्रतिभावान, कौशल्यपूर्ण खेळाडू लाभले. परंतु, सांघिक कामगिरीत अपयशी ठरल्याने भारताला आशियातील बलाढय़ संघांना आव्हान देणे शक्य झाले नाही.

काही वर्षांपूर्वी इंडियन सुपर लीगला (आयएसएल) प्रारंभ झाल्यानंतर भारतीय फुटबॉलला उभारी मिळेल आणि प्रतिभावान, युवा खेळाडू पुढे येतील, असा आशेचा किरण निर्माण झाला. या अपेक्षा काहीच अंशी पूर्ण झाल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून लिस्टन कोलाको, मनवीर सिंग, उदांता सिंह, अनिरुद्ध थापा, ब्रँडन फर्नाडेस, सहल समाद यांसारख्या युवकांनी भारतीय संघात स्थान मिळवले. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यातील गुणवत्ता अजून प्रश्नांकित आहे. तसेच ‘आयएसएल’मध्ये जगभरातील आघाडीचे फुटबॉलपटू खेळत नसल्याने या युवकांची प्रगती मर्यादित राहते आहे. या गोष्टीचा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा, छेत्रीसारखा दर्जेदार फुटबॉलपटू पुन्हा लाभण्यासाठी भारताला अनेक वर्षे वाट पाहावी लागेल, हे निश्चित!