scorecardresearch

रविवार विशेष : खो-खो लीगचा प्रयोग उत्तम; पण..

क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीगपासून (आयपीएल) सुरू झालेले व्यावसायिक लीगचे लोण इतर खेळांमध्ये पसरायला वेळ लागला नाही.

रविवार विशेष : खो-खो लीगचा प्रयोग उत्तम; पण..
खो-खो लीग

ज्ञानेश भुरे

क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीगपासून (आयपीएल) सुरू झालेले व्यावसायिक लीगचे लोण इतर खेळांमध्ये पसरायला वेळ लागला नाही. भारतातील मातीमधील कुस्ती आणि कबड्डीतही लीग आली. खो-खो या आणखी एका भारतीय खेळाचे पहिले पर्व रविवारी पहिल्या विजेतेपदासह संपेल. हो-नाही करता चार वर्षे अनेक आघाडय़ांवर काथ्याकूट केल्यानंतर या वर्षी खो-खो लीग अवतरली.

अल्टिमेट खो-खो लीग या नावाने या व्यावसायिक लीगला सुरुवात झाली. भारताचा पारंपरिक मानला जाणारा खेळ हा मातीवरून अधिकृतपणे मॅटवर आला. एक महिन्याच्या व्यग्र कार्यक्रमानंतर आज लीगचा विजेता ठरणार आहे. खेळाचे नियम ठरवण्यापासून, संघमालक निश्चित करणे, खेळाडूंची निवड करणे या सगळय़ात चार वर्षे निघून गेली. अनेक वेगळे नियम अमलात आणले. एक खेळाडू मारला की दोन गुण, डाइव्हला बोनस गुण, पोलवर खेळाडू बाद केला की विशेष गुण, एक बॅच झाली की विश्रांती, आक्रमण करताना खेळाडू बाद करण्यासाठी कुठेही कसाही गडी टिपू शकणारा वजीर असे नियम खो-खोच्या नियमावलीत नव्याने चिकटले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून खो-खो घराघरात पोहोचला.

मातीतल्या खेळाला या निमित्ताने ग्लॅमर मिळाले. खेळाडू, पंच थेट फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहू लागले. खो-खो खेळाने जणू कात टाकल्याचेच वाटत होते. कबड्डी खेळाला जेव्हा लीगचे स्वरूप मिळाले, तेव्हाही खेळ वेगवान करण्यासाठी काही नियम करण्यात आले. चढाईला वेळेच्या बंधनात अडकवण्यात आले, तीन खेळाडूंमध्ये पकड झाल्यास बोनस गुण मिळाला. तसेच काही बदल खो-खो मध्ये करण्यात आले. खो-खोला वेगळे स्वरूप देण्याचा धाडसी प्रयत्न या लीगने निश्चित केला. खेळाडूंना अर्थार्जनाचे माध्यम उपलब्ध झाले. खेळाला मिळालेले ग्लॅमर आणि खेळाडूंचे अर्थार्जन हे फायदे लीगमुळे झाले. पण, खेळाची गुणवत्ता राहिली का, हा प्रश्न कायम राहिला.

कबड्डी आणि खो-खो खेळात कौशल्याबरोबर निर्णयक्षमतेचा कस लागतो. व्यावसायिक लीग खेळवण्यासाठी आणि थेट प्रक्षेपणासाठी कबड्डीने काही नवे नियम आणले. खो-खो लीगसाठीदेखील हे केले गेले. फरक इतकाच की कबड्डीचे नियम हे पचनी पडले. त्यापेक्षा ते पचनी पाडण्यासाठी किंवा रुजविण्यासाठी त्यांच्याकडे ई. प्रसाद राव सारखा तज्ज्ञ होता. खो-खो लीगसाठी नियम करताना जसा तज्ज्ञाचा अभाव होता, तसा केलेले नियम योग्य आहेत, हे ठासून सांगणारे नेतृत्वही त्यांच्याकडे दिसून आले नाही. अशा सगळय़ा पार्श्वभूमीवर लीगचे पहिले पर्व पार पडले. मात्र, भविष्यात लीग चालू ठेवताना अनेक आघाडय़ांवर सुधारणा करावी लागेल, याची कल्पना एव्हाना संयोजकांना आली असेल आणि आली नसेल, तर त्यांनी वेळीच जागे व्हायला हवे आहे.

लीगसाठी केलेल्या नियमातील सर्वात मारक म्हणजे ‘स्काय डाइव्ह’ला मिळणाऱ्या बोनस गुणांचा नियम. या नियमामुळे अधिक गडी बाद करणारा संघही केवळ प्रतिस्पर्धी संघाने अधिक ‘स्काय डाइव्ह’ मारल्यामुळे  पराभूत झाल्याचे लीगमध्ये दिसून आले. एरवी खो-खो खेळात डावाने मिळवलेले विजय येथे दिसलेच नाहीत. बचाव करणाऱ्या संघाला असलेली बोनस गुणाची मुभा आणि थेट प्रक्षेपणाची वेळ यामुळे सामना वेळ संपेपर्यंत चालूच राहात होता. त्याचबरोबर तीन जणांची तुकडी बाद झाली की घेतली जाणारी विश्रांती यामुळे कमालीचा वेगवान असणारा खेळ संथ झाला आणि खेळाडूंच्या कौशल्यापेक्षा तो पंचांच्या हातात अधिक गेल्याचेच दिसून आले. या सगळय़ामुळे खो-खोच्या मूळ स्वरूपाला कुठे तरी धक्का बसतोय, याची भीती प्रत्येक सामन्यागणिक वाढली. आता हेच नियम राष्ट्रीय स्पर्धेत वापरण्यात येणार असतील, तर लीगमुळे दूर चाललेला खो-खोचा चाहता आणखी दूर जाणार आहे.

मातीतला आकर्षक वाटणारा खेळ मॅटवर आल्यावर खेळाडूचे आयुष्य कमी करणारा ठरतोय की काय, अशी  चिंता निर्माण झाली आहे. मुळात हे आपले नैसर्गिक खेळ आहेत. परदेशात ते खेळले जावेत म्हणून त्यात आपण का बदल करायचे. आपले नैसर्गिक खेळ आहेत तसे परदेशातून स्वीकारले जावेत असा आग्रह आपण का धरत नाहीत. अनेक परदेशी खेळ आहेत, जे त्यांनी त्यांच्याच चौकटीत राहून सर्वाच्या गळी उतरवले. कालाय तस्मै नम: म्हणून सोडून देणार असू, तर एक दिवस या खेळातीलही आपले वर्चस्व कमी झाल्याशिवाय राहणार नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sunday special kho kho league great experiment professional sports ysh

ताज्या बातम्या