अन्वय सावंत

‘ब्रिटनचा सर्वात आवडता जर्मन व्यक्ती!’ अशी दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकरची ख्याती होती. ब्रिटन आणि जर्मनी या आघाडीच्या युरोपीयन देशांतील राजकीय संबंध व त्यांच्यातील इतिहास तणावपूर्ण आहे. मात्र, तरीही दक्षिण-पश्चिम जर्मनीतील लेमन येथे जन्मलेल्या बेकरला ब्रिटनमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी फार वेळ लागला नाही.

१९८५मध्ये वयाच्या १७व्या वर्षी बिगरमानांकित बेकरने ब्रिटनमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद पटकावत इतिहास घडवला. त्यानंतर ब्रिटनसह जगभरातील टेनिसप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास त्याने सुरुवात केली. मात्र, मैदानावरील यश त्याला मैदानाबाहेर टिकवणे अवघड गेले. ज्या ब्रिटनमध्ये पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याची बेकरने किमया साधली होती, तिथेच त्याला दिवाळखोरी कायद्यांतर्गत दोषी आढळल्याने अडीच वर्षांच्या कालावधीसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

मैदानावरील अलौकिक कामगिरीसह सर्वत्र कौतुक, चाहत्यांचे प्रेम मिळत असले, तरी क्रीडापटूंनी मैदानाबाहेर जबाबदार वर्तन करून ते प्रेम टिकवणे, आपली प्रतिमा व प्रतिष्ठा जपणे अत्यंत आवश्यक असते. परंतु बॉिक्सगपटू माइक टायसन, दक्षिण आफ्रिकेचा पॅरा-धावपटू ऑस्कर प्रिटोरियस यांसारखे काही दिग्गज खेळाडू त्यात अपयशी ठरल्याची उदाहरणे असून या यादीत बेकरचाही समावेश झाला आहे.

१९८४ साली आपल्या व्यावसायिक टेनिस कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या बेकरने एका वर्षांच्या कालावधीतच ग्रँडस्लॅम विजेता म्हणून मिरवण्याचा मान मिळवला. त्यानंतर त्याने आणखी दोन वेळा विम्बल्डन (१९८६, १९८९), दोन वेळा ऑस्ट्रेलियन (१९९१, १९९६) आणि एकदा अमेरिकन (१९८९) खुली टेनिस स्पर्धा जिंकण्याची दिमाखदार कामगिरी केली. तसेच ११९२च्या ऑलिम्पिकमध्ये बेकरने पुरुष दुहेरीत मायकल स्टिचच्या साथीने सुवर्णपदकाचीही कमाई केली होती. आपल्या आक्रमक शैलीतील खेळामुळे आणि वेगवान सव्‍‌र्हिसमुळे ‘बूम बूम’ या नावाने ओळखला जाणारा बेकर जागतिक क्रमवारीतही अग्रस्थानी विराजमान होता.

खेळाडू म्हणून यशस्वी कामगिरी करणाऱ्या बेकरची मैदानाबाहेर मात्र वेगळी प्रतिमा होती. बिनधास्त जीवनशैली, बहुस्त्रीसंबंध धोरण, वादग्रस्त विधाने या गोष्टींमुळे तो कायमच प्रकाशझोतात राहिला. एकेकाळी तीन कोटी, ८० लाख पौंड संपत्तीचा मालक असलेल्या बेकरला १९९९मध्ये टेनिसमधून निवृत्ती पत्करल्यानंतर आपले राहणीमान टिकवणे अवघड जाऊ लागले.

तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात चढ-उतार सुरू राहिले. बेकर १९९३मध्ये बार्बरा फेल्टसशी विवाहबंधनात अडकला आणि २००१मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर बेकरने २००९मध्ये शार्ली ‘लिली’ बेकरशी विवाह केला. मात्र, कालांतराने त्यांच्यातही मतभेद, वाद सुरू झाले आणि २०१८मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मग तो त्याच्यापेक्षा वयाने लहान लिलियन दे काव्‍‌र्हालियो मोन्तेरो या महिलेच्या प्रेमात पडला.

दरम्यानच्या काळात बेकर आर्थिक संकटात सापडण्यास सुरुवात झाली. २००२मध्ये साधारण १७ लाख  युरोचा कर चुकवल्याप्रकरणी म्युनिक न्यायालयाने बेकरला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा रद्दही करण्यात आली आणि त्याला तीन लाख युरोचा दंड ठोठावण्यात आला. त्यावेळी आपली चूक मान्य करण्याचा मोठेपणाही बेकरने दाखवला नाही. उलट या प्रकरणामुळेच माझ्यावर टेनिसमधून निवृत्ती पत्करण्याची वेळ आल्याचे तो म्हणाला. हेच चित्र आता दिवाळखोरी प्रकरणाच्या खटल्यादरम्यान दिसले.

जून २०१७मध्ये बेकरला दिवाळखोर घोषित केल्यानंतर त्याने आपल्या खात्यातील हजारो डॉलरची रक्कम इतर खात्यांमध्ये वळवली. तसेच त्याने जर्मनीतील एक मालमत्तेची माहिती दिली नाही. त्याने आठ लाख २५ हजार युरोचे बँक कर्ज आणि एका कंपनीतील गुंतवणूकही लपवून ठेवली. त्यामुळे लंडनमधील साऊथवॉर्क क्राऊन न्यायालयाने बेकरला दिवाळखोरी कायद्याअंतर्गत दोषी ठरवताना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, बेकरला आपली चूक मान्य असल्याचे किंवा त्याला वाईट वाटत असल्याचे त्याच्या कृतीमधून जराही जाणवले नाही, अशी टिपण्णी निकाल देताना न्यायाधीश डेबोरा टेलर यांनी केली.

बेकरची टेनिस इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना होते. तसेच तो उत्तम समालोचक आणि टेनिस या खेळाचा चांगला प्रसारक म्हणून ओळखला जातो. त्याने प्रशिक्षक म्हणूनही यश संपादन केले. त्याच्या मार्गदर्शनात नोव्हाक जोकोव्हिचने तीन वर्षांच्या कालावधीत सहा ग्रँडस्लॅम जेतेपदांना गवसणी घातली. टेनिसच्या मैदानावर एखाद्या राजाप्रमाणे वावर असलेल्या बेकरला मैदानाबाहेरील चुका मात्र महागात पडल्या आहेत. त्यामुळे टेनिस आणि क्रीडा चाहत्यांच्या मनातील त्याची प्रतिमा डागाळली आहे, हे निश्चित!

anvay.sawant@expressindi