|| अन्वय सावंत

देशासाठी खेळताना खेळाडूला राष्ट्रीय प्रशिक्षकांऐवजी वैयक्तिक प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेऊ देणे कितपत योग्य आहे? खेळाडू आणि राष्ट्रीय क्रीडा संघटनांपैकी जास्त महत्त्वाचे कोण आहे? सध्या असे काही प्रश्न भारतीय क्रीडाक्षेत्रात उपस्थित केले जात आहेत. भारताची आघाडीची टेबल टेनिसपटू मनिका बत्रा प्रकरणामुळे राष्ट्रीय प्रशिक्षक विरुद्ध वैयक्तिक प्रशिक्षक हा विषय ऐरणीवर आला आहे. मनिकाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास नकार दिला होता.

सांघिक क्रीडाप्रकारांमध्ये खेळाडूंना संघ-सहकाऱ्यांचा आधार असतो. मात्र, वैयक्तिक क्रीडाप्रकारांमध्ये खेळाडू एकट्यानेच खेळत असल्यामुळे सामन्यादरम्यान प्रशिक्षकांचा सल्ला, त्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा मानला जातो. मनिकाने ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक रॉय यांना सामन्यावेळी सोबत बसूही दिले नाही. त्यांच्याऐवजी वैयक्तिक प्रशिक्षक सन्मय परांजपे यांची मदत घेण्यासाठी तिने भारतीय टेबल टेनिस महासंघाकडे परवानगी मागितली. महासंघाने त्यांना सराव सत्रांसाठी परवानगी दिली, पण त्यांना सामन्यावेळी तिला मार्गदर्शन करता आले नाही.

काही दिवसांनी मनिकाने मोठा गौप्यस्फोट केला. ऑलिम्पिक पात्रता फेरीदरम्यान रॉय यांनी सामनानिश्चितीचा प्रस्ताव ठेवल्याचे तिने सांगितले. त्यामुळे ऑलिम्पिकदरम्यान वैयक्तिक प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेतल्याचे तिने स्पष्ट केले. त्यानंतर मनिका आणि महासंघामध्ये चढाओढ सुरू झाली. परंतु त्यापेक्षाही राष्ट्रीय प्रशिक्षक विरुद्ध वैयक्तिक प्रशिक्षक याबाबत अधिक चर्चा रंगू लागली.

भारतीय खेळाडूने राष्ट्रीय प्रशिक्षकांची मदत घ्यायला नकार देण्याची ऑलिम्पिकमधील ही पहिलीच घटना नव्हती. नेमबाज मनू भाकरकडून पदकाची अपेक्षा केली जात होती. मात्र, या स्पर्धेला काही महिने शिल्लक असताना १९ वर्षीय मनूने राष्ट्रीय प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याऐवजी तिने रौनक पंडित यांनी मदत घेतली. राणा प्रशिक्षक असताना मनूने विश्वचषक, राष्ट्रकुल स्पर्धा आणि युवा ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी केली होती. मात्र, ऑलिम्पिकमध्ये पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तिला पदकांनी हुलकावणी दिली.

कोणत्याही स्पर्धेपूर्वी अचानक प्रशिक्षक बदलणे खेळाडूसाठी फायदेशीर ठरू शकत नाही, हे यातून सिद्ध झाले. प्रशिक्षक आणि खेळाडूमध्ये एक नाते निर्माण झालेले असते. खेळाडूंमधील गुण-अवगुण, त्यांच्या जमेच्या बाजू, त्यांच्यातील उणिवा हे मुद्दे अनेक वर्षे मार्गदर्शन केल्यावर प्रशिक्षकांना कळतात. त्यामुळे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत मर्यादित वेळेत नव्या प्रशिक्षकांकडून फार अपेक्षा करणे योग्य ठरत नाही.

भारताची सर्वात यशस्वी महिला ऑलिम्पिकपटू पी. व्ही. सिंधू आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यातही काही काळापूर्वी वादाची ठिणगी पडली. कालांतराने या ठिणगीची दाहकता वाढली. गोपीचंद यांच्या अकादमीत सिंधूने बॅडमिंटनचे धडे गिरवले. पुढे जाऊन त्यांच्या मार्गदर्शनात तिने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. मात्र, राष्ट्रीय प्रशिक्षक असल्याने गोपीचंद यांना इतर खेळाडूंच्या कामगिरीकडेही लक्ष द्यावे लागले. यासह अन्य काही कारणांनी सिंधू आणि गोपीचंद यांच्यात मतभेद सुरू झाले. तिने गोपीचंद अकादमी सोडून कोरियन प्रशिक्षक पार्क टे सांग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यास सुरुवात केली.

तसेच सहा वेळच्या जगज्जेत्या मेरी कोमला वैयक्तिक प्रशिक्षक छोटे लाल यांना ऑलिम्पिकसाठी सोबत नेण्यास परवानगी देण्यात आली, पण अमित पांघलच्या प्रशिक्षकांसाठी वेगळा न्याय दिला गेला. राष्ट्रीय प्रशिक्षक असताना वैयक्तिक प्रशिक्षकांची आवश्यकता काय? हा प्रश्न क्रीडा संघटनांना पडणे यात नवल नाही. मात्र, खेळाडूंची गरज समजून त्यांचे हित जपल्यास देशाचा फायदा होणार असेल, तर वैयक्तिक प्रशिक्षकांना परवानगी न देणे नक्कीच चुकीचे ठरेल. परंतु राष्ट्रीय प्रशिक्षक हे त्यांच्यातील गुणवत्तेमुळेच त्या पदावर आहेत, हे खेळाडूंनी समजून घेत त्यांचा आदर केला पाहिजे, हेही तितकेच खरे!

anvay.sawant@expressindia.com

गरजेनुसार वैयक्तिक प्रशिक्षकांना परवानगी!

सांघिक खेळ आणि वैयक्तिक खेळांचे मापदंड वेगवेगळे असतात. वैयक्तिक खेळांमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षकांवर संपूर्ण चमूची जबाबदारी असते. त्यामुळे काही वेळा खेळाडूंना गरज वाटल्यास वैयक्तिक प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेऊ देण्यात काहीच वावगे नाही. मात्र, प्रत्येकच खेळाडूसाठी हा नियम लागू होऊ शकत नाही. देशाला सातत्याने पदके मिळवून दिलेल्या खेळाडूला आणि नवख्या खेळाडूला समान वागणूक देणे योग्य नाही. खेळाडूंची कामगिरी ही ९० टक्के किंवा त्याहूनही अधिक त्यांच्या मानसिकतेवर अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेचा प्रामुख्याने विचार झाला पाहिजे. तसेच मोठ्या स्पर्धेपूर्वी अचानक प्रशिक्षक बदलणे खेळाडूसाठी फायदेशीर ठरू शकत नाही. – जय कवळी, माजी बॉक्सिंगपटू, प्रशिक्षक, संघटक