रविवार विशेष : जिंकण्याच्या जिद्दीला झळाळी!

ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षभरापासून तब्बल पाच ट्वेन्टी-२० मालिका गमावल्या.

|| ऋषिकेश बामणे

ऑस्ट्रेलिया संघ आणि आयसीसी क्रिकेट स्पर्धांचे जेतेपद यांच्यात फार पूर्वीपासून घनिष्ठ मैत्री; परंतु गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्यात काही तरी बिनसल्याचे जाणवले. खेळाडूंमधील ती जिंकण्याची जिद्दही कोठे तरी दिसेनाशी झाली. जगभरात करोनाचे सावट पसरण्यास सुरुवात झाल्यावर त्यांना अनेकदा नामुष्कीला सामोरे जावे लागले. मात्र या सर्व बाबींना मागे सारून कुणाच्याही खिजगणतीत नसलेल्या ऑस्ट्रेलियाने थेट ट्वेन्टी-२० विश्वाचषकावर नाव कोरले. त्यांच्या या यशामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील जिंकण्याची जिद्द पुन्हा अधोरेखित झाली.

मुळात संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वाचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया जेतेपद मिळवेल, असे कोणी सुरुवातीला म्हटले असते तर नक्कीच त्याची थट्टा करण्यात आली असती. भारत, पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज या पाचपैकीच एखादा संघ विश्वाचषक उंचावेल, असे अनेकांना वाटले; परंतु ऑस्ट्रेलियाने सर्वांना मागे टाकत प्रथमच ट्वेन्टी-२० विश्वाचषक पटकावला. विश्वाचषकापूर्वी झालेल्या सराव सामन्यात त्यांनी न्यूझीलंडला नमवूनच अभियानाचा प्रारंभ केला आणि अंतिम लढतीतही त्यांच्यावरच सरशी साधली. इंग्लंडविरुद्ध अव्वल-१२ फेरीत ऑस्ट्रेलियाला दारुण पराभव पत्करावा लागला; परंतु त्यातून सावरत ऑस्ट्रेलियाने मागे वळून पाहिले नाही.

ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षभरापासून तब्बल पाच ट्वेन्टी-२० मालिका गमावल्या. यादरम्यान बांगलादेशनेही त्यांना धूळ चारल्याने ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी तरी गाठेल की नाही, याविषयी शंका होती. डेव्हिड वॉर्नरचा हरवलेला सूर, स्टीव्ह स्मिथऐवजी मिचेल मार्शला तिसऱ्या क्रमांकावर दिलेली बढती यांसारखे अनेक मुद्दे ऑस्ट्रेलियाला महागात पडण्याची भीती होती. मात्र वॉर्नरने तीन अर्धशतकांसह २८९ धावा करून स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला, तर मार्शने निर्णायक अंतिम सामन्यात ५० चेंडूंत नाबाद ७७ धावांची धडाकेबाज खेळी साकारून सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरतानाच ऑस्ट्रेलियाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. लेगस्पिनर ?डम झॅम्पाच्या योगदानाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. त्याने ७ लढतींत १३ बळी मिळवले. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या १६ धावांत ३ बळी मिळवून कर्तृत्व सिद्ध केले. यष्टिरक्षक मॅथ्यू वेडने पाकिस्तानविरुद्ध केलेली कमाल भारतीय चाहत्यांना कायमस्वरूपी स्मरणात राहील, हे निश्चित. भारत स्पर्धेतून आधीच बाहेर पडल्याने उत्साहहीन अशा झालेल्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या जेतेपदाने किमान थोडी तरी रंगत आणली, हे मान्य करावे लागेल.

१९८७ मध्ये ?लन बॉर्डर यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम एकदिवसीय विश्वाचषक उंचावला. त्यानंतर १९९९ मध्ये स्टीव्ह वॉच्या शिलेदारांनी अजिंक्यपद काबीज केले. २००३ आणि २००७ या वेळच्या दोन विश्वाचषकांमध्ये तर एकही लढत न गमावता रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियाने विश्वाचषक विजयाची मालिका कायम राखली. २०११ मध्ये भारतानेच उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा अश्वामेध रोखला; परंतु २०१५ मध्ये मायकल क्लार्कच्या सेनेने कसर भरून काढत ऑस्ट्रेलियाला पाचवा विश्वाचषक जिंकून दिला. हे कमी म्हणून की काय, २००६ आणि २००९ मध्ये त्यांनी चॅम्पियन्स करंडकही उंचावला.

परंतु २००७ पासून सुरू झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वाचषकावर मोहोर उमटवण्यात त्यांना सातत्याने अपयश येत होते. २०१० मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. मात्र इंग्लंडने त्यांना नेस्तनाबूत केले. विशेष म्हणजे २०१५चा विश्वाचषक जिंकल्यानंतर २०२१ पर्यंत त्यांना एखाद्या आयसीसी स्पर्धेची अंतिम फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे एक वेळ ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटला उतरती कळा लागली, असेच चित्र निर्माण झाले. २०१८ मध्ये स्मिथ, वॉर्नर, कॅमेरून बँक्रॉफ्ट हे त्रिकूट चेंडू फेरफार प्रकरणात दोषी आढळल्याने ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट पूर्णपणे हादरले. आरोन फिंचकडे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०, तर संघात पक्के स्थानही नसलेल्या टिम पेनकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. यादरम्यान भारताने दोन वेळा त्यांना त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत धूळ चारली.

हे सर्व धक्के सहन करत ऑस्ट्रेलिया पुन्हा उभी राहिली ती फक्त लढाऊ वृत्तीच्या बळावर. वर्षभरातील कामगिरी कशीही होऊ दे, आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांचा वेगळाच रुबाब असतो. अखेरच्या चेंडूपर्यंत हार मानायची नाही, हे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या रक्तातच भिनलेले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेले प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचेही कौतुक करणे गरजेचे आहे, कारण या वृत्तीचेच फलित म्हणून अखेर १४ वर्षांचा वनवास संपवून नव्या रूपातील ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-२० जेतेपदाचा मानाचा तुराही शिरपेचात रोवून घेतला. ग्लेन मॅक्सवेलने लगावलेला फटका सीमारेषा गाठण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मैदानात घेतलेली धाव फार काही सांगून गेले. त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये अनोख्या शैलीत केलेला जल्लोषही गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या कायापालटाला प्रारंभ झाला आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

rushikesh.bamne@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sunday special stubborn to win icc cricket championships australia team akp

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या