|| ऋषिकेश बामणे, अन्वय सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘खेळांमध्ये जगभरातील तमाम नागरिकांना एकत्रित आणण्याची ताकद आहे,’ नेल्सन मंडेला यांचे हे वाक्य क्रीडा क्षेत्राची महती स्पष्ट करते. चाहत्यांमध्ये उत्साह, उत्कंठा आणि ऊर्जेचा संचार करण्याबरोबरच त्यांना यशापयश, खिलाडूवृत्तीचे महत्त्व पटवून देणे ही क्रीडा क्षेत्राची वैशिष्ट्ये. त्यामुळे अनेकांची कारकीर्द घडवणारे क्रीडा क्षेत्र ठप्प पडण्याच्या घटना दुर्मीळच.

मात्र मार्च २०२० पासून करोनारूपी कर्दनकाळाने भारतासह संपूर्ण विश्वभर थैमान घातले. त्यामुळे काही काळ क्रीडा क्षेत्राची घडी बिघडली. यातून सावरत आता जवळपास दोन वर्षांनी मुंबईसह महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्र पुन्हा भरारी घेण्यास सज्ज झाले होते. परंतु करोनाची तिसरी लाट आणि नवा उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील मैदाने पुन्हा एकदा सुनी पडली. यामुळे काही खेळाडूंनी करोनाला कंटाळून निवृत्तीही पत्करली. तर काहींनी मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे विश्रांतीही घेतली. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानेसुद्धा भविष्यातील आव्हानांचा धोका लक्षात घेत निवृत्तीची घोषणा केली. येत्या काळातही करोनामुळे अनेकांची कारकीर्दही धोक्यात येण्याची शक्यता उद्भवली आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध क्रीडा प्रकारांतील मान्यवरांनी करोनामुळे सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांविषयी व्यक्त केलेले हे मनोगत.

करोनामुळे टेनिसमधील जवळपास एक पिढीच उद्ध्वस्त झाली, असे म्हणायला हरकत नाही. कारण १६ ते १८ वयोगटातील खेळाडूंना आता थेट वरिष्ठ गटात खेळावे लागत आहे. या वयोगटात खेळाडूंच्या तंत्रावर प्रशिक्षकांना अधिक मेहनत घेता येते. परंतु सध्या ते शक्य नाही. यामुळे खेळाडूंच्या खेळात त्या दर्जाचा विकास झालेला नाही. त्याशिवाय जे आपले प्रमुख खेळाडू आहेत. त्यांच्या क्रमवारीत कमालीची घसरण झाली. यामुळे एटीपी आणि ग्रँडस्लॅम स्पर्धांना पात्र ठरण्यासाठी त्यांना अधिक परिश्रम करावे लागले. सानिया मिर्झाचे वयोमान पाहता तिचा निवृत्तीचा निर्णय योग्य होता, असे वाटते. आता पुण्यात होणाऱ्या टाटा खुल्या स्पर्धेद्वारे राज्यातील टेनिसला पुन्हा चालना मिळेल, अशी आशा आहे. जैवसुरक्षा परिघामुळे टेनिसपटूही चिंतित आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत परिस्थिती आणखी बिघडली, तर टेनिसपटूंच्या निवृत्तीची मालिका सुरू होण्याची भीती आहे.

– सुंदर अय्यर, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे सचिव

मानसिकदृष्ट्या करोनाची तिसरी लाट सर्वांसाठीच हानीकारक ठरत आहे. कारण आपण आरोग्याची काळजी घेऊन पुन्हा एकदा दैनंदिन जीवन जगण्यास प्रारंभ केला होता. मात्र आता पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करावी लागेल. जैवसुरक्षा परिघाचा होणारा त्रासही दुर्लक्षित करण्यासारखा नाही. बेन स्टोक्स, ग्लेन मॅक्सवेलने करोनामुळे मानसिकतेवर परिणाम झाल्याचे मान्य केले होते. तसेच कोहलीनेसुद्धा जैवसुरक्षा परिघातील आव्हानांविषयी सातत्याने भाष्य केले आहे. त्यामुळे क्रिकेटचा विचार केल्यास ‘बीसीसीआय’ने खेळाडूंच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. मुळात करोनाचे सावट कायम राहिले, तर अधिकाधिक खेळाडू कमी वयातच निवृत्त होतील आणि त्यामुळे युवा पिढी क्रीडा क्षेत्राकडे वळण्यास घाबरेल. देशांतर्गत स्थानिक क्रिकेटची सध्याची स्थिती बिकट असून यातून लवकरात लवकर मार्ग काढणे गरजेचे आहे.

– प्रवीण अमरे, क्रिकेट  प्रशिक्षक

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा नेमबाजी या क्रीडा प्रकारावर नक्कीच परिणाम झाला आहे. नेमबाजीत दीर्घकालीन यशासाठी सातत्याने सराव गरजेचा असतो. मात्र, करोनामुळे युवा फळीतील नेमबाजांना सरावाची आणि स्पर्धांमध्ये खेळण्याची सातत्याने संधी मिळू शकलेली नाही. आपल्या देशात अलीकडच्या काळात युवा नेमबाजांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, करोनाचा अनेक कुटुंबांना आर्थिक फटका बसला. त्यामुळे काही युवा खेळाडूंनी नेमबाजीकडे पाठ फिरवल्याचीही उदाहरणे आहेत. या सर्व गोष्टींचे दूरगामी परिणाम दिसून येतील. तसेच करोनामुळे खेळाडूंना जैव-सुरक्षा परिघात राहावे लागत आहे. सतत बंदिस्त वातावरणात राहून, तुमच्यावर विविध निर्बंध असताना मैदानात जाऊन यशस्वी कामगिरी करणे सोपे नाही. आता खेळाडूंच्या मानसिक आरोग्याचा विचार करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. 

– सुमा शिरूर, माजी नेमबाज आणि प्रशिक्षक

इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनाचा उशिरा शिरकाव झाला. त्यावेळी टाळेबंदी लावण्यात आली, आंतरराष्ट्रीय विमानप्रवास बंद करण्यात आला. याचा खेळांवर परिणाम झाला, याबाबत दुमत नाही. इतर देशांतून करोना हद्दपार झालेला नसला, तरी त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या तुलनेत आपण सात-आठ महिने मागे आहोत. तसेच करोनामुळे व्यायामशाळा, खेळांची मैदाने, जलतरण तलाव बंद ठेवण्यात आले. याचा खेळाडूंच्या सरावावर आणि शारीरिक तंदुरुस्तीवर विपरीत परिणाम झालेला आहे. त्यांना पुन्हा सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी दोन-तीन स्पर्धांचा अवधी लागत आहे. त्यातच खेळाडूंना बरेचदा प्रशिक्षकांचे प्रत्यक्षात मार्गदर्शन लाभत नाही. या सर्व परिस्थितीतही किदम्बी श्रीकांत (रौप्य) आणि लक्ष्य सेन (कांस्य) यांनी जागतिक र्अंजक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पदकांची कमाई केली, हे कौतुकास्पद होते.  – प्रदीप गंधे, माजी बॅडमिंटनपटू आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunday special tennis the third wave of corona spot area in maharashtra akp
First published on: 23-01-2022 at 00:05 IST