इतर खेळांप्रमाणे फुटबॉल हाही अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. इथे कोणता खेळाडू, कोणत्या क्षणी बाजी मारेल याचा अंदाज बांधणे थोडे कठीणच. मैदानावरची ही अनिश्चितता इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलच्या दुसऱ्या सत्रासाठी शुक्रवारी पार पडलेल्या भारतीय खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत पाहायला मिळाली. सर्व अंदाज चुकीचे ठरवत मेघालयाच्या युजेनसेन लिंडोहने लिलावात पहिला कोटय़धीश होण्याचा मान पटकावला. मात्र भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने लिलावात सर्वाधिक रक्कम आपल्या खिशात टाकली. परंतु त्याला अपेक्षेनुसार भाव मिळाला नाही. ८० लाख मूळ किंमत असलेल्या छेत्रीला मुंबई सिटी एफसीने एक कोटी २० लाख रुपयांत विकत घेतले, तर दुसरीकडे २७.५ लाख मूळ किंमत असलेल्या मध्यरक्षक लिंगडोहला एफसी पुणे सिटी संघाने एक कोटी पाच लाखांत आपल्या चमूत दाखल केले. हे दोन्ही कोटय़धीश खेळाडू आय-लीगमध्ये बंगळुरू एफसी क्लबकडून खेळतात. हे दोन अनपेक्षित लिलाव वगळता बंगळुरूचाच बचावपटू रिनो अँटोनेही आपल्या मूळ किमतीच्या पाचपट रक्कम कमावली. १७.५ लाखांवरून सुरू झालेली त्याच्यावरील बोली ९० लाखांपर्यंत थांबली आणि गतविजेत्या अ‍ॅटलेटिको दी कोलकाता संघाने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
आयएसएलच्या पहिल्या सत्राला मुकलेल्या भारताच्या अव्वल दहा खेळाडूंचा लिलाव शुक्रवारी मुंबई पार पडला. यामध्ये भारताचा कर्णधार आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल नावावर असलेल्या छेत्रीला आपल्या संघात दाखल करून घेण्यासाठी चढाओढ रंगेल असे वाटले होते; परंतु हे सर्व अंदाज फोल ठरले. मुंबई, दिल्ली आणि चेन्नई हे क्लब वगळता इतर कोणताही संघ छेत्रीसाठी उत्सुक दिसला नाही. या तिन्ही क्लबच्या शर्यतीत मुंबई सिटीने एक कोटी २० लाख रुपयांत छेत्रीला संघात दाखल करून घेतले.
‘‘छेत्रीला संघात घेण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार होतो. छेत्रीला इतक्या कमी किमतीत आम्ही विकत घेऊ, असे स्वप्नातही वाटले नव्हते,’’ अशी प्रतिक्रिया मुंबई सिटीचा सहमालक व अभिनेता रणबीर कपूर यांनी दिली. रणबीरच्या या प्रतिक्रियेमुळे छेत्री थोडासा निराश वाटत होता. ‘‘गेली १३ वष्रे फुटबॉल खेळताना पैशांचा विचार केला नाही, तर मग आता कशाला करू. फुटबॉल हेच माझ्यासाठी सर्व काही आहे,’’ अशी प्रतिक्रिया देत छेत्रीने आपली निराशा झटकली. फ्रान्सच्या निकोलस अनेल्कासोबत खेळण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद त्याने या वेळी व्यक्त केला. ३० वर्षीय छेत्रीने चार वेळा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा सवरेत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला आहे. तसेच भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक ५० गोल त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी ८० लाख ही मूळ किंमत ठरविण्यात आली होती. मात्र मुंबई वगळता इतर संघांनी त्याला न घेणेच पसंत केले. या अव्वल दहा खेळाडूंसाठी एकूण ७ कोटी २२ लाख रक्कम खर्च करण्यात आली असून एफसी गोवा आणि केरला ब्लास्टर
यांनी कोणत्याही खेळाडू विकत न घेणे पसंत केले.
spt02मुंबईने सुनील छेत्रीसाठी मूळ किंमत मोजली
भारतीय फुटबॉल संघाचा चेहरा सुनील छेत्रीला मुंबई सिटी एफसी संघाने मूळ किमतीतच आपल्या ताफ्यात दाखल केले. ८० लाख मूळ किंमत असलेल्या छेत्रीसाठी इतर क्लबकडून बोली लावण्यात अनुत्सुकता दाखवल्यानंतर मुंबईने ४० लाख अतिरिक्त रक्कम मोजून छेत्रीला संघात सहभागी केले. त्यामुळे छेत्रीची खरेदी किंमत एक कोटी २० लाख दिसत असली तरी मुळात मुंबईला ८० लाखच छेत्रीसाठी मोजावे लागणार आहेत. ‘‘छेत्रीला १ कोटी २० लाख हे मुंबईने दिले, तर बंगळुरू एफसी क्लबकडून छेत्रीला ७५ लाख रुपये मिळाले आहेत. असे एकूण एक कोटी ९५ लाख रुपये छेत्रीचे होतात, परंतु करारानुसार त्याच्यासाठी १ कोटी ५५ लाख ही रक्कम नियोजित केली होती. बंगळुरू एफसीकडून येणाऱ्या ७५ लाखांपैकी ४० लाख हे मुंबई संघाला मिळाले आणि म्हणून मुंबईला केवळ ८० लाखच मोजावे लागणार आहेत,’’ अशी माहिती आयएसएलचे प्रवक्ते लीलाधर सिंग यांनी दिली.

भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. असंख्य क्लबतर्फे खेळलो आहे. मात्र मुंबईस्थित क्लबतर्फे खेळण्याचा योग आला नव्हता. लिलावात कमी किंमत मिळाली असे वाटत नाही. भारतासाठी १३ वर्षे खेळतो आहे. आता पैसा हे प्राधान्य नाही. मुंबई सिटी एफसीसाठी सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करीन. अनेलकासह खेळण्याची संधी मिळणे, हा माझा सन्मान आहे.
सुनील छेत्री, मुंबई सिटी एफसी

लिलावात किती किंमत मिळेल हा विचारच डोक्यात नव्हता. आयएसएल स्पर्धेत खेळायचे होते. पण लिलाव प्रक्रियेचा अनुभव थरारक होता. मला एक कोटीपेक्षा जास्त किंमत मिळेल याची कल्पनाही केली नव्हती.
 युजेनसन लिंगडोह, पुणे सिटी एफसी