Sunil Gavaskar Advice to Abhishek sharma: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माच्या खेळीवर सर्वांच्या नजरा होत्या. २०२५ वर्ष आपल्या फटकेबाजीने गाजवलेला अभिषेक शर्मा भारतासाठी वर्ल्डकपमध्ये महत्त्वाचा फलंदाज ठरणार होता, पण अभिषेक शर्मासाठी टी-२० विश्वचषकाची सुरूवात मात्र फारशी चांगली झाली नाही. यानंतर आता माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्करांनी त्याला चांगली कामगिरी करण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे.
टी-२० विश्वचषकात पदार्पण करणारा अभिषेक शर्मा अमेरिकेविरूद्ध पहिल्याच सामन्यात गोल्डन डकवर झेलबाद झाला. तर दुसऱ्या सामन्यापूर्वी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. तर पाकिस्तानविरूद्ध सामन्यातही अभिषेक डकवर बाद झाला. यासह अभिषेकने टी-२० विश्वचषकात अद्याप आपलं खातं उघडलेलं नाही.
स्पर्धेच्या सुरुवातीला अभिषेकची कामगिरी निराशाजनक ठरली असून त्याला सलग दोन वेळा शून्यावर बाद व्हावं लागलं. त्यामुळे डावाच्या सुरुवातीला त्याच्या फलंदाजीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. इंडिया टुडेशी बोलताना गावसकर यांनी डावखुऱ्या फलंदाजाला आक्रमक खेळ दाखवण्यापूर्वी बेसिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
सुनिल गावस्करांनी अभिषेक शर्माला नेमका काय सल्ला दिला?
सुनील गावस्कर म्हणाले, “अभिषेक शर्मासाठी माझा विनाआमंत्रित सल्ला असा आहे की आधी एक सिंगल धाव काढ. एवढंच. त्यानंतर हवं तर जोरदार फटकेबाजी सुरू कर. पण सुरुवातीला एक झटपट धाव घे, ज्यामुळे पायांची हालचालही वेगाने होईल आणि मग त्यानंतर आपला नेहमीप्रमाणे आक्रमक खेळ.”
“खेळाडूला स्वतःवर असलेला आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. त्याने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावलं आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याचा योग्य फायदा घेत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या चांगल्या फॉर्मला गृहित धरत नाही. अनेक फलंदाज अशी चूक करतात आणि सुरुवातीपासूनच आक्रमक फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही सेट झाल्यानंतर बाहेर जाऊन मोठे फटके खेळू शकता आणि त्याचं उत्तम उदाहरण त्याच्या खेळातून दिसत आहे.”
अभिषेक शर्माच्या बाबतीत नेमकं काय बिनसलं?
अभिषेक शर्मा अलीकडील शानदार कामगिरीनंतर मोठ्या अपेक्षांसह वर्ल्डकप खेळण्यासाठी उतरला होता. मात्र आजारपण आणि खराब सुरुवातीमुळे त्याची मोहीम अडखळली. २३ वर्षीय अभिषेकला वायरल ताप आणि पोटाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आणि त्यामुळे तो नामिबियाविरुद्धचा सामना खेळू शकला नाही. त्यानंतर तो कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघात परतला.
मात्र पुनरागमन अपेक्षेप्रमाणे ठरलं नाही. त्या सामन्यातही तो शून्यावर बाद झाला. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांत तो दोनदा शून्यावर माघारी परतला आहे. त्यामुळे डावाच्या सुरुवातीलाच तो अनावश्यक घाई करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

