भारताचा माजी कर्णधार लिटल मास्टर सुनील गावस्कर हे आपल्या पिढीतील एक प्रतिभावंत खेळाडू होते. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळणे म्हणजे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी पर्वणी असते. पण मार्गदर्शनाच्या मुद्द्यावरून सध्या गावसकर यांनी भारतीय संघातील खेळाडूंवर नाराजी व्यक्त केली आहे. अजिंक्य रहाणे वगळता इतर कोणालाही माझ्या मार्गदर्शनाची गरज वाटत नाही, असे विधान त्यांनी संघातील खेळाडूंना उद्देशून केले आहे. 'सध्याच्या भारतीय संघातील खेळाडू हे माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी येत नाहीत. पूर्वी, सचिन, द्रविड, वीरेंद्र सेहवाग, व्ही व्ही एस लक्ष्मण हे खेळाडू दौऱ्यावर असताना माझ्याशी नेहमी चर्चा करत असत. सल्लामसलत करत. पण सध्याची पिढी ही वेगळी आहे. त्यांना फलंदाजी, गोलंदाजचे मार्गदर्शन करण्यासाठी निरनिराळे प्रशिक्षक असतात. त्यामुळे त्यांना माझ्याकडे येणे तितकेसे गरजेचे वाटत नाही. केवळ मुंबईकर अजिंक्य रहाणे कधी कधी माझ्याकडे सल्ला मागण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी येतो' असे गावस्कर म्हणाले. याच मुलाखतीत गावस्कर यांनी विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावरही ताशेरे ओढले. भारतीय संघ पहिल्या कसोटीआधी पूर्ण तयारीनिशी मैदानावर उतरला नव्हता, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले.