Sunil Gavaskar Statement: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २५३ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडनेही पूर्ण जोर लावला. पण इंग्लंडचा संघ विजयापासून अवघ्या ७ धावा दूर राहिला. हा सामना जिंकून भारतीय संघाने चौथ्यांदा या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. ज्यावेळी गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी धावत असतो, त्यावेळी लक्ष विचलित करण्यासाठी कुठलाही आवाज केला जात नाही. पण जसप्रीत बुमराह गोलंदाजी करण्यासाठी आला, त्यावेळी प्रेक्षकांना त्याच्या नावाचा जयघोष करण्यासाठी सांगितलं जात होतं. हे चुकीचं आहे, असं सुनील गावसकरांचं म्हणणं आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात धावांचा बचाव करत असताना जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला त्यावेळी डीजेने बूम बूम बुमराहच्या नावाचा जयघोष करण्यासाठी आग्रह केला. त्यावेळी समालोचन करत असलेले सुनील गावसकर म्हणाले, “गोलंदाजी करत असताना प्रेक्षकांना बूम बूम बुमराहच्या नावाचा जयघोष करायला सांगणं हे चुकीचं आहे. षटकांच्या मध्ये असं करणं चुकीचं नाही. पण षटक सुरू असताना असं करणं हे चुकीचं आहे. हा वर्ल्डकप आहे.”

सुनील गावसकरांनी टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी भारत आणि वेस्ट इंडिज यांचा सामना ईडन गार्डनच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यादरम्यान लेजर शो चे आयोजन करण्यात आले होते. या लेजर शोवरून सुनिल गावसकर यांनी आयसीसीवर जोरदार टीका केली होती.

भारतीय संघाचा विजय

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनने केलेल्या ८९ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकांअखेर २५३ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंकडून जेकब बेथेलने १०५ धावांची खेळी केली. पण इंग्लंडचा संघ विजयापासून ७ धावा दूर राहिला.