Sunil Gavaskar Statement On Rohit Sharma: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजयाची नोंद केली. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली होती. त्यानंतर तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने दमदार पुनरागमन केलं आणि विजय मिळवला. वेस्ट इंडिजकडून शे होपने १६२ धावांची दमदार शतकी खेळी केली. तर भारतीय संघाकडून फलंदाजी करताना रोहित शर्माने ९२ धावा केल्या. रोहितकडे शतक पूर्ण करण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली. दरम्यान या सामन्यांतर माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी रोहित शर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

हॉटस्टारच्या एका कार्यक्रमात बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, “रोहित ९२ धावांवर बाद झाल्याने मी खूप निराश झालो. कारण तो आपलं शतक पूर्ण करू शकला नाही. वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेनंतर तो निवृत्तीची घोषणा करू शकतो. ज्यावेळी तो निवृत्ती घेण्याचा विचार करेल, त्यावेळी मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की त्याच्या शतकांची संख्या ही त्याच्या वयापेक्षा जास्त असावी.”

यासह त्यांनी रोहित शर्माच्या फलंदाजी करण्याच्या बदलाबाबत बोलताना म्हटले की, “रोहित शर्माच्या फलंदाजी स्टाईलमध्ये थोडा बदल झाला आहे. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेदरम्यान त्याने पहिल्याच चेंडूपासून हल्लाबोल करायला सुरुवात केली होती. त्यामुळे तो लवकर बाद होण्याची भीती होती. त्याला माहीत होतं की, त्याने खेळपट्टीवर टिकून राहणं किती महत्वाचं आहे. २०२३ वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान त्याने वेगवान सुरुवात करून दिली होती. पण तो फक्त ३०-४० धावा करून बाद होणारा फलंदाज नाही. तो शतक पूर्ण करणारा फलंदाज आहे. त्यामुळे त्याचं शतक पाहून मला खूप आनंद होतो.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “हो, या सामन्यात त्याचं शतक हुकलं. पण गेल्या सामन्यात त्याने शतक पूर्ण केलं होतं. त्याला एक गोष्ट समजली आहे, ती म्हणजे फलंदाज म्हणजे फक्त शतक झळकावणं नाही. जर त्याने मोठी खेळी केली, तर तो ७०-८० चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण करतो. हे संघासाठी फायदेशीर ठरतं. कारण ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये हा स्कोअरिंग रेट खूप चांगला आहे. यासह सोशल मीडियावर स्लो फलंदाजीमुळे ट्रोलही केलं जात नाही.”