Sunil Gavaskar On IPL 2026: भारतात सध्या आयपीएल २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत आतापर्यंत फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. याआधी १२०-१५० धावा जरी केल्या तरी गोलंदाज आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरायचे की ते या धावांचा यशस्वी बचाव करू शकतात. पण आता २५० धावा करूनही विजयाची हमी नसते. गोलंदाजांची ही स्थिती पाहता, अनेक दिग्गज खेळाडूंनी चिंता व्यक्त केली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी देखील गोलंदाजांच्या स्थितीवरून चिंता केली आहे. सुनील गावसकरांच्या मते, वर्तमान क्रिकेटमधील नियम आणि परिस्थिती ही गोलंदाजांसाठी खूप कठीण आहे.
सुनील गावसकरांनी गोलंदाजांच्या सध्याच्या परिस्थितीचं वर्णन हे, एक हात बांधून गोलंदाजी केल्यासारखं केलं आहे. तर सध्याचे नियम हे फलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सुनील गावसकरांनी स्पोर्ट्सस्टारच्या कॉलममध्ये वाईड आणि बाऊंसरच्या नियमाबाबत मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी लिहिले की, “बाऊन्सरच्या उंचीबाबत पंचांनी अधिक लवचिक असायला हवं. त्यांनी मधला मार्ग काढायला हवा. जर चेंडू फलंदाजांच्या किंचित वरून जात असेल पण त्याच्या आवाक्यात असेल, तर तो वाईड देऊ नये. बाऊन्सरवर वाईड देणं म्हणजे गोलंदाजाला एक हात बांधून गोलंदाजी करायला सांगण्यासारखं आहे.”
सुनील गावसकरांनी मोलाचा सल्ला देत लिहिले की, “जर नियमात बदल केला आणि गोलंदाजांना फलंदाजांच्या एक फूट वरून चेंडू टाकण्याची अनुमती दिली गेली, तर यामुळे गोलंदाजांना दिलासा मिळेल.”
तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “जर फलंदाजांना हवा तसा शॉट खेळण्याची अनुमती दिली जाते, मग गोलंदाजांवर बंधनं का?” आयपीएल २०२६ स्पर्धेत धावांचा अतिरेत झाला आहे. याआधी २०० धावांचा पाठलाग करणं खूप कठीण होतं. पण आता २०० धावांचा बचाव करणं कठीण झालं आहे. २५० हून अधिक धावांचा देखील यशस्वीपणे पाठलाग केला आहे. त्यामुळे नियमात बदल करायला हवं असं सुनील गावसकर यांचं मत आहे.
