Sunil Gavaskar keeps Promise given to suryakumar yadav: भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी भारताने वर्ल्डकप जिंकला तर काय करणार, याचं खास वचन खेळाडूंना देत असल्याचा ट्रेंड सुरू आहे. सुनील गावस्कर भारताच्या विजयानंतर हे वचन पूर्णदेखील करतात. टीम इंडियाच्या टी-२० विश्वचषक २०२६ विजयानंतरही गावस्करांनी सूर्याला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. भारताने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीलंड संघाचा ९६ धावांनी पराभव करत ऐतिहासिक वर्ल्डकप विजय नोंदवला. या विजयानंतर गावस्करांनी पाहा काय केलं…, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

भारताचा टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरूवात होण्यापूर्वी सुनील गावस्करांनी एक खास वचन दिलं होत. टी-२० विश्वचषक २०२६सुरू होण्यापूर्वी बोलताना गावस्कर म्हणाले की, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद यशस्वीपणे कायम ठेवलं, तर ते एक खास गोष्ट करतील.

टीम इंडियाने अंतिम सामन्यात उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या बळावर न्यूझीलंड संघाचा पराभव केवा. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला उत्कृष्ट वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. बुमराहने या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला. तर फलंदाजीत अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन व शिवम दुबे यांनी धावांची अक्षरश: पाऊस पाडत संघाला २५५ धावांपर्यंत नेलं. प्रत्युत्तरात भारताच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंड संघ १५९ धावांवर सर्वबाद झाला.

सुनील गावस्करांनी सूर्याला काय वचन दिलं होतं?

सुनील गावस्करांनी भारताच्या या विजयानंतर मनसोक्त डान्स केला आहे. टी-२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी गावस्कर म्हणाले होते, “तुम्ही (टीम इंडिया) जेव्हा चषक उंचावाल, तेव्हा मी नाचायला सुरुवात करेन,” असं गावस्कर म्हणाले होते. “डान्स करणं हेच माझं कार्डिओ आहे. बाकी सगळे जण जास्त कडक कार्डिओ करतात, पण मला या वयात ते शक्य नाही. त्यामुळे मी अगदी थोडंसं कार्डिओ करतो, आणि ते म्हणजे डान्स करणं. आपल्या कर्णधाराला आणि देशाचा झेंडा वर जाताना पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. कधी कधी भावना आपोआप बाहेर येतात.”

Sunil Gavaskar Dance With Suryakumar Yadav After India win
भारताच्या वर्ल्डकप विजयानंतर सूर्या व सुनील गावस्कर डान्स करताना

भारताच्या या विजयानंतर कॉमेंट्रीनंतर मैदानावर जात सुनील गावस्करांनी खेळाडूंची भेट घेतली आणि मुलाखतीदेखील घेतल्या. यादरम्यान सुनील गावस्कर सूर्यकुमार यादवसह आनंदाने डान्स करताना दिसले. दरम्यान गावस्करांचा अजून एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते मैदानावर इतर कॉमेंटेटर्सच्या मध्ये उभे राहून लहान मुलाप्रमाणे एकटेच डान्स करत होते. मागे स्टेडियममध्ये हम इंडियावाले हे गाणं सुरू होतं. शो सुरू होताच सुनील गावस्कर शांतपणे उभे राहिले. पुन्हा एकदा सुनील गावस्करांनी दिलेलं हे वचन पूर्ण केलं.

सुनील गावस्करांनी भारताच्या महिला संघाची खेळाडू जेमिमा रॉड्रीग्जला देखील दिलेलं वचन पूर्ण केलं होतं. गावस्करांनी तिला सांगितलं होतं की भारताच्या महिला संघाने वर्ल्डकप जिंकला जेमिमासह ते गाण्याचं जॅमिंग सेशन करतील. यानंतर महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता, त्यानंतर जेमिमासाठी खास बॅटच्या आकाराचं गिटार तिला भेट दिलं होतं.