Sunil Gavaskar On Abrar Ahmed Picks In Hundred League: काही दिवसांपूर्वीच काव्या मारनच्या मालकीचा संघ ‘सनरायझर्स लीड्स’ संघाने ‘द हंड्रेड’ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावली होती. पाकिस्तानचा गोलंदाज अबरार अहमदला सनरायझर्स लीड्स संघाने २.५ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं. अबरारला संघात घेतल्यानंतर काव्या मारनला प्रचंड ट्रोल केलं गेलं. तर सनरायझर्स लीड्स संघाचं एक्स अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं होतं. तसेच अनेक दिग्गज खेळाडूंनी या निर्णयावरून जोरदार टीकाही केली होती. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी देखील या निर्णयावरून नाराजी व्यक्त केली आहे.
सुनील गावसकर यांनी आपल्या कॉलममध्ये लिहिले की, “भारतीय संघमालक पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावून जे मानधन देतात, त्या पैशातून त्यांच्या सरकारला टॅक्स द्यावं लागतं. त्याचा वापर अप्रत्यक्षपणे शस्त्र खरेदी करण्यासाठी केला जातो. हीच शस्त्रे भारतीय जवान आणि नागरिकांच्या मृत्यूस कारणाभूत ठरतात. ही जाणीव उशिरा झाली असली, तरीदेखील भारतीय मालकीच्या संस्थांनी पाकिस्तानी खेळाडू किंवा कलावंतांना संधी देणं टाळलं पाहिजे.”
तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “पेमेंट करणारी संस्था भारतात असो किंवा परदेशात. जर त्यांचा मालक भारतीय असेल, तर तो एका प्रकारे भारताच्या हाणीसाठी हातभार लावत आहे.” सुनील गावसकर हे पाकिस्तानी खेळाडूंशी जवळचे संबंध ठेवण्यासाठी ओळखले जातात. काही दिवसांपू्र्वीच त्यांनी इम्रान खान यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती. यासह माजी कर्णधारांनी पत्र लिहून, इम्रान खान यांना वैद्यकिय सुविधा मिळावी, अशी मागणी केली होती. यासह ते बाबर आझमला फलंदाजीचे टीप्स देताना दिसून आले होते. पण मे महिन्यात झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आणि त्यानंतरच्या तणावानंतर सुनील गावसकरांची भूमिका बदलली आहे. टी-२० वर्ल्डकपआधी झालेल्या आशिया चषकात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता. सुनील गावसकर यांनी या निर्णयाचं समर्थन केलं होतं. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं होतं.
यावरून हे स्पष्ट झालं आहे की, भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडूंची मैदानावरील आणि मैदानाबाहेरील मैत्री आता संपली आहे. तन्वीर अहमद, कामरान अकमल, इंजमाम-उल-हक, सकलेन मुश्ताक आणि रशीद लतीफसारखे अनेक माजी पाकिस्तानी खेळाडू भारताबाबत द्वेषपूर्ण भूमिका घेतात. भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही वर्षांत जे काही यश मिळवलं आहे, त्यावर पाकिस्तानच्या खेळाडूंचा नेहमीच जळफळाट दिसून आला आहे.
