भारतीय क्रिकेटमध्ये बदलाला सुरुवात झाली असून आता रोहित शर्मा आणि राहुल द्रविड ही जोडी संघाला पुढे नेण्यासाठी सज्ज झाली आहे. या जोडीकडून क्रिकेटप्रेमींना तसेच क्रिकेट जगतातील तमाम जाणकारांना मोठ्या आशा आहेत. माजी भारतीय खेळाडू सुनील गावसकर यांनीही टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या जोडीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. गावसकर यांच्या म्हणण्यानुसार या दोघांच्या स्वभावात खूप साम्य आहे, त्यामुळे त्यांचे बाँडिंग चांगले राहण्याची अपेक्षा आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला आज बुधवारपासून जयपूर येथे सुरुवात होणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर हे पहिले आव्हान असेल.

हेही वाचा – IND vs NZ: व्यंकटेश अय्यर करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण?; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

या दोघांच्या जोडीबद्दल स्टार स्पोर्ट्सवर गावसकर म्हणाले, ”जर तुम्ही दोघांच्या स्वभावांवर नजर टाकली तर ते खूप समान आहेत. रोहित राहुल द्रविडसारखाच शांत आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतील, असे मला वाटते. तो जेव्हा खेळायचा तेव्हा आम्हाला वाटायचे की जोपर्यंत राहुल द्रविड क्रीजवर आहे तोपर्यंत भारतीय फलंदाजी सुरक्षित आहे. त्यामुळेच त्याच्यावर आलेली मुख्य प्रशिक्षकाची नवी जबाबदारी तो चांगल्या प्रकारे पार पाडेल, असा मला विश्वास आहे.”

चाहत्यांना अपेक्षा

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताला यंदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. कोहलीने स्पर्धेपूर्वीच टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यातच रवी शास्त्री यांचाही मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. अशा स्थितीत पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी नव्याने संघबांधणी करण्याची भारताला संधी आहे. त्यामुळे ‘आयपीएल’मध्ये आपल्या कल्पक नेतृत्वाने मुंबई इंडियन्सला पाच वेळा जेतेपदाचा किताब मिळवून देणारा रोहित आणि युवा खेळाडूंना पैलू पाडण्यात पटाईत असलेला द्रविड यांची जोडी भारतासाठीही मोलाचे योगदान देईल, अशी तमाम चाहत्यांना अपेक्षा आहे.