Sunil Gavaskar India Squad ODI World Cup 2027 Update: आगामी आयसीसी वनडे विश्वचषक २०२७साठी भारताचे माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनी भारताचा संघ निवडला आहे. स्पर्धा सुरू होण्यास अजून बराच कालावधी बाकी असला तरीही या आगामी स्पर्धेची तयारी आधीच सुरू झाली आहे. कर्णधार आणि प्रशिक्षक आता सर्व वनडे सामन्यांकडे स्पर्धेपूर्वीच्या सराव-चाचण्या म्हणून पाहत आहेत. तर रोहित शर्मा-विराट कोहली पुढील वर्ल्डकप खेळणार का, यावरून तर प्रत्येक मालिकेदरम्यान चर्चा होते.

देशातील माजी क्रिकेटपटूही खेळाडूंच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. काही दिग्गज माजी खेळाडूंनी तर आगामी स्पर्धेसाठी आपला पसंतीचा १५ सदस्यांचा संघही जाहीर केला आहे; यात भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांचाही समावेश आहे. गावस्कर यांनी आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला १५ सदस्यांचा संघ जाहीर केला असून, त्यात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे; मात्र त्यांनी काही बड्या नावांकडे दुर्लक्षही केलं आहे.

सुनील गावस्करांनी कोणत्या खेळाडूंकडे केलं दुर्लक्ष?

सुनील गावस्कर यांनी आगामी स्पर्धेसाठी ज्या दहा प्रमुख खेळाडूंचा विचार केलेला नाही, त्यामध्ये यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, ऋषभ पंत, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश आहे. यशस्वी जैस्वाल यांना वगळण्याच्या गावस्कर यांच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे; कारण एकदिवसीय (ODI) फॉरमॅटमध्.े जेव्हा जेव्हा जैस्वालला संधी मिळाली आहे, तेव्हा त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत.

यशस्वी जैस्वालने भारतीय संघासाठी एकदिवसीय (ODI) फॉरमॅटमध्ये एकूण सहा सामने खेळले आहेत. या सहा डावांमध्ये त्याने ७१.२५ च्या सरासरीने २८५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतकांचा समावेश आहे. त्याने ९७.६० च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. वनडेमधील नाबाद ११९ धावांची खेळी ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

वनडे वर्ल्डकप २०२७ साठी सुनील गावस्करांनी निवडलेला भारतीय संघ

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकीपर), अर्शदीप सिंग आणि नितीश कुमार रेड्डी