Sunil Gavaskar Promise to Suryakumar Yadav: टी-२० विश्वचषक २०२६ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली २०२४च्या वर्ल्डकपचं जेतेपद पटकावलं होतं, त्यामुळे यंदा भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप भारतातच राहील या उद्देशाने खेळणार आहे. कोणताच संघ आजवर घरच्या मैदानावर आणि सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकू शकलेला नाही. टीम इंडियाने जर यंदाचं जेतेपद पटकावलं तर तो मोठा विक्रम असेल. याच दरम्यान भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी टीम इंडिया जिंकल्यास एक खास गोष्ट करण्याचं वचन कर्णधार सूर्यकुमार यादवला दिलं आहे.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पुन्हा एकदा आपल्या हृदयस्पर्शी विधानाने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टी-२० विश्वचषक २०२६च्या पार्श्वभूमीवर बोलताना गावस्कर म्हणाले की, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद यशस्वीपणे कायम ठेवलं, तर ते एक खास गोष्ट करतील.
इंडिया टुडेच्या ‘सलाम क्रिकेट’ या चर्चासत्रात बोलताना गावसकरांनी भारत मोठ्या स्पर्धा जिंकतो, हे आजही त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे, हे त्यांनी मोकळेपणाने सांगितलं. वयाच्या ७५व्या वर्षीदेखील, भारताच्या यशाशी जोडलेल्या भावना तितक्याच भावुक करणाऱ्या आणि महत्त्वाच्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
भारताने वर्ल्डकप जिंकल्यास मी…, सुनील गावस्करांचं सूर्यकुमार यादवला मोठं वचन
“तुम्ही (टीम इंडिया) जेव्हा चषक उंचावाल, तेव्हा मी नाचायला सुरुवात करेन,” असं गावस्कर म्हणाले. “डान्स करणं हेच माझं कार्डिओ आहे. बाकी सगळे जण जास्त कडक कार्डिओ करतात, पण मला या वयात ते शक्य नाही. त्यामुळे मी अगदी थोडंसं कार्डिओ करतो, आणि ते म्हणजे डान्स करणं. आपल्या कर्णधाराला आणि देशाचा झेंडा वर जाताना पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. कधी कधी भावना आपोआप बाहेर येतात,” असेही त्यांनी सांगितल.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला उद्देशून गावस्करांनी आपला मेसेज अगदी सोप्या शब्दांत सांगत म्हणाले, “तू फक्त तुझं काम चोख कर, चषक जिंकून आण, बाकीचं सगळं मी पाहून घेतो.”
ही पहिलीच वेळ नाही की सुनील गावस्करांनी टीम इंडियाच्या विजयापूर्वी भन्नाट प्रॉमिस केलं आहे. यापूर्वी भारतात झालेल्या महिला विश्वचषकादरम्यान, भारतीय संघाने विजेतेपद पटकावल्यास जेमिमा रॉड्रिग्जसोबत गाण गाणार, अशी त्यांनी घोषणा केली होती. नंतर त्यांनी तिला बॅटच्या आकाराचं गिटार भेट देत तो क्षण अधिक खास बनवला.
सुनील गावसकरांनी फक्त बोलण्यापुरतं वचन दिलं नव्हतं, तर त्यांनी ते खास अंदाजात पूर्ण केलं होतं. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या प्रयत्नात असताना, चाहत्यांचं लक्ष गावसकरांच्या या वचनाकडे असणार आहे आणि जर भारताने टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद कायम ठेवलं, तर गावसकरांचा आनंदी नृत्याविष्कार या स्पर्धेतील सर्वात आनंददायी क्षणांपैकी एक ठरू शकतो.

