Sunil Gavaskar Statemet On Team India: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाज चमकले, पण गोलंदाजीत बऱ्याच चुका झाल्या. भारतीय फलंदाजांनी २४९ धावा केल्या. पण भारतीय गोलंदाजांनी या धावा १८ षटकात खर्च केल्या. त्यामुळे भारतीय गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकरांच्या मते, रांचीत झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील १७ वे षटक कुलदीप यादवऐवजी मयंक यादव किंवा मग अर्शदीप सिंगने टाकायला हवे होते.

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजला सुरुवातीला मोठे धक्के बसले होते. पण त्यानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं. श्रेयस अय्यरने १७ वे षटक टाकण्याची जबाबदारी कुलदीप यादवकडे सोपवली. या षटकात त्याने २४ धावा खर्च केल्या. ज्यामध्ये ३ षटकार आणि १ चौकार आणि एका वाईडचा समावेश होता. या षटकामुळे सामना पूर्णपणे वेस्ट इंडिजच्या बाजूने झुकला.

जियोस्टारवर बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, “मी असतो तर १७ वे षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग किंवा मयंक यादवला गोलंदाजीसाठी बोलावलं असतं. अर्शदीप सिंगने आपल्या शेवटच्या (१८ व्या षटकात) षटकात खोऱ्याने धावा खर्च केल्या. पण मयंक यादवने सुरुवातीलाच मोठे धक्के दिले होते.

सुनील गावसकर म्हणाले, “मयंकचा इकॉनॉमी रेट जवळपास १२ चा होता. त्यावेळी वेस्ट इंडिजला त्याहून अधिक धावांची गरज होती. त्यामुळे जर त्याने विकेट घेतला असता तर सामना फिरला असता.” मयंक यादवने सुरुवातीलाच वेस्ट इंडिजला ३ मोठे धक्के दिले होते. पहिल्याच षटकात कामिल पूरन आणि शिमरॉन हेटमायरला बाद केलं. त्यानंतर पुढच्या षटकात त्याने रोमन पॉवेलला बाद केलं.

तसेच ते पुढे म्हणाले की, “जर एक विकेट मिळाला असता, तर नवीन फलंदाज मैदानात उतरला असता. त्यामुळे विरोधी संघ आपोआप बॅकफुटवर आला असता. त्यामुळे मयंक यादवला गोलंदाजी करायला बोलवायला हवं होतं. यासह ९ व्या षटकात शिवम दुबेला गोलंदाजीसाठी बोलावणं हा चुकीचा निर्णय होता. त्यावेळी फलंदाज धावा करण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी कुलदीप यादवला गोलंदाजीसाठी बोलवायला हवं होतं.”