पाकिस्तानने टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे. हा सामना मूळतः १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी-२० विश्वचषक खेळण्यावर बहिष्कार टाकल्याबद्दल म्हटलं होतं आणि वर्ल्डकप खेळण्याचा निर्णय सरकार घेईल असंही सांगितलं होतं. आता पाकिस्तान सरकारने काही अटींसह संघाला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे, ज्यामध्ये भारताविरूद्ध सामना खेळू नये ही मोठी अट आहे. यावर आता सुनील गावस्करांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
पाकिस्तानच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यांनीही या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. सुनील गावस्करांनी पाकिस्तानचे निर्णय, त्यांचे खेळाडू अशा बऱ्याच मुद्द्यांवरून भाष्य करत संघाला ट्रोल केलं आहे.
माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना गावस्कर म्हणाले की, पाकिस्तान क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे निर्णय बदलले जाणं नवीन नाही. जसं पाकिस्तानचे खेळाडू निवृत्ती जाहीर करतात आणि काही दिवसांतच निवृत्ती घेतात, तसंच हेही होऊ शकतं, असं त्यांनी सूचित केलं.
“पुढच्या २-४ दिवसांत या प्रकरणावर जगभरातून खेळाडूंची व स्वत: पाकिस्तानी खेळाडूंच्याही प्रतिक्रिया येतील, तेव्हा हा निर्णय कदाचित बदलला जाऊ शकतो. यात नवीन काय आहे? पाकिस्तानचे क्रिकेटपटू निवृत्ती घेतात आणि चार दिवसांनी निवृत्तीतून माघार घेतात. वर सांगतात आमचे इतके चाहते आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही खेळलं पाहिजे, हेच होऊ शकतं;” असे सुनील गावस्कर यांनी आजतक या वृत्तवाहिनीवरील थेट प्रक्षेपणात म्हटले.
“संपूर्ण पाकिस्तानी चाहते जेव्हा म्हणतील तुम्ही हा काय निर्णय घेतला आहे. तेव्हा हा निर्णय बदलला जाईल. निर्णय मागे घेण्यात इतकं असं काय जातंय, पाकिस्तानी खेळाडूंनी हे दाखवून दिलं आहे, की ते निवृत्ती घेतात आणि ८-१० दिवसांनी निवृत्ती मागे घेतात. तसंच हा निर्णय पण १५ तारीखच्या आधी मागे घेतला जाईल,” असं म्हणत सुनील गावस्करांनी पाकिस्तानची लाज काढली.
हरभजन सिंग या मुद्द्याबाबत पुढे म्हणाला, “मला वाटतं पाकिस्तान सरकारचं हे विधान फार काळ टिकणार नाही. इकडे तिकडे चर्चा होईल, प्रकरण तापेल आणि शेवटी, पाकिस्तान सामना खेळेल. पूर्वी असं असायचं की आम्हाला भारतात यायचं नाही आणि भारत पाकिस्तानात जाणार नाही, पण आता तुम्ही बांगलादेशच्या मुद्द्यात उडी मारली आहे आणि तो मोठा बनवला. आता हे आयसीसी स्पर्धेचं नुकसान करत आहे.”

