Sunil Gavaskar on CSK: आयपीएल २०२६ची सुरूवात चेन्नई सुपर किंग्ससाठी खूपच खराब झाली आहे. चेन्नईला पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभावाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय चेपॉकच्या अभेद्य किल्ल्यामध्येही संघाने सामना गमावण्याचा सिलसिला सुरू ठेवला आहे. २०० अधिक धावांचा डोंगर उभारल्यानंतरही पंजाब किंग्सने सीएसकेला घरच्या मैदानावर पराभवाचं पाणी पाजलं. या पराभवानंतर माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी चेन्नईची पोलखोल करत संघाचं नेमकं कुठे चुकतंय हे सांगितलं.

आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या खराब सुरुवातीनंतर, महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आता संघाच्या कमकुवतपणावर उघडपणे चर्चा केली आहे. सलग दोन पराभवांमुळे सीएसकेच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि गावस्कर यांनी संघाची सर्वात मोठी समस्या स्पष्टपणे दाखवून दिली आहे. पंजाब किंग्सविरुद्ध पाच गडी राखून झालेल्या पराभवासह, चेन्नई सुपर किंग्सला हंगामातील आपल्या दोन्ही सलामीच्या सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे संघाच्या कामगिरीवर टीका केली जात आहे.

“आतापर्यंत जे काही दिसलं आहे, त्यानुसार संपूर्ण स्पर्धेत सीएसकेची सर्वात मोठी चिंता त्यांची गोलंदाजी असेल. याचा अर्थ, आपल्या गोलंदाजांना संधी देण्यासाठी त्यांना सातत्याने २२५-२३० च्या आसपास धावा कराव्या लागतील,” असं गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले.

“आता बहुतेक संघांकडे फलंदाजीची मोठी फळी आहे, जसं आपण पंजाब किंग्सच्या बाबतीत पाहिलं, जिथे मार्कस स्टोइनिस सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने उत्कृष्ट शॉट्स खेळत फटकेबाजी केली. अनेक संघांकडे फलंदाजीची मोठी फळी असल्याने, चेन्नईला आपल्या गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल,” असं गावस्कर पुढे म्हणाले.

पंजाब किंग्सविरूद्धच्या सामन्यात आयुष म्हात्रेने ४३ चेंडूंमध्ये ७३ धावा करून संघाला २०९ धावांपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. गावस्करांनी त्याच्या फलंदाजीचे कौतुक केलं आणि म्हणाले की, त्यांच्या मते तिसरा क्रमांक आयुष म्हात्रेसाठी योग्य आहे. त्याने १९ वर्षांखालील संघात खालच्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, पण तिसरा क्रमांक त्याला अधिक अनुकूल ठरू शकतो.

इतिहासात पहिल्यांदाच, सुपर किंग्स मागील हंगामात गुणतालिकेत तळाशी राहिला होता. या वेळीसुद्धा त्यांची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वात आणि धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईचा संघ हंगामात कशी कामगिरी करणार, यावर सर्वांच्या नजरा असतील.