Sunil Gavaskar Suggest To Drop This 2 Players: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषक फायनलचा सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. या अंतिम सामन्यावर देशाच्या नजरा आहेत आणि टीम इंडियाच्या विजयासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. टी-२० वर्ल्डकप इतिहासात भारतीय संघाने कधीच न्यूझीलंड संघाला पराभूत केलेलं नाही, त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. या फायनलपूर्वी सुनील गावस्कर हे एका खेळाडूवर संतापले असून दोन जणांना फायनलसाठीच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर करण्याचा सल्ला दिला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरूद्ध सांघिक कामगिरीच्या बळावर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. पण यादरम्यान काही खेळाडूंचा फॉर्म हा संघासाठी मोठा चिंतेचा विषय आहे.

सुनील गावस्कर म्हणाले की, अभिषेक शर्माने अद्याप त्याच्या चुकांमधून धडा घेतलेला नाही आणि तो सातत्याने त्याच पद्धतीने बाद होत आहे. अभिषेक टी-२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यापासून खराब फॉर्मातून जात आहे. फिरकीपटूविरूद्ध खेळताना अभिषेक शर्माने आक्रमक फटके खेळताना आपली विकेट गमावली आहे. त्याने विश्वचषकात आतापर्यंत फक्त ८९ धावा केल्या आहेत.

सुनील गावस्करांनी कोणत्या २ खेळाडूंना संघाबाहेर करण्याचा सल्ला दिला?

सुनील गावस्कर म्हणाले, “हा निर्णय सोपा नाही. अभिषेक शर्मा आयसीसी टी-२० क्रमवारीतील नंबर वन फलंदाज आहे, पण त्याने त्याच्या बाद होण्याच्या पद्धतींमधून काहीच धडा घेतलेला नाही. गोलंदाज सातत्याने अशा ठिकाणी गोलंदाजी करत आहेत जिथे त्याला खेळण्यासाठी जागा मिळत नाही आणि तो तिथेच बाद होत आहे. माझी चिंता अशी आहे की त्याने अद्याप त्याची रणनीती बदललेली नाही किंवा तो तसा बदल करू शकत नाहीये.”

गावस्कर पुढे म्हणाले, “मला असं वाटतं की इशान किशन आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात करावी आणि रिंकू सिंगला संघात स्थान मिळावं. रिंकूमध्ये आत्मविश्वास आहे. तुम्ही त्याच्या शरीरावर ‘गॉड्स प्लॅन’चा टॅटू पाहिला असेल आणि कधीकधी अशा खेळाडूंसाठी गोष्टी आपोआप व्यवस्थित घडून येतात.”

वरूण चक्रवर्तीला ड्रॉप करा

सुनील गावस्करांनी संघाला अजून एक सल्ला देत सांगितलं, “कुलदीप यादवला संघात समाविष्ट करणं हा मी आणखी एक बदल योग्य म्हणेन. सध्या वरुण चक्रवर्तीचा आत्मविश्वास कमी असल्याचं दिसून येत आहे. तो सुपर-८ मध्ये बलाढ्य संघांविरुद्ध खूप धावा देत होता. अहमदाबादसारख्या मोठ्या मैदानावर कुलदीप यादव हा एक चांगला पर्याय असू शकतो, कारण तो सपाट खेळपट्टीवरही चेंडू टर्न करू शकतो.”

अंतिम सामन्यापूर्वी रिपोर्ट्समध्ये आलेल्या माहितीनुसार टीम इंडिया या सामन्यातही प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणता बदल करणार नाही. तर पत्रकार परिषदेतही सूर्यकुमार यादवने वरूण चक्रवर्तीला पूर्णपणे पाठिंबा दाखवला होता. आता नाणेफेकीनंतर संघ काय निर्णय घेणार यावर सर्वांच्या नजरा असतील.