Sunil Gavaskar Reaction India vs West Indies 4th T20: भारत आण वेस्ट इंडिज यांच्यातील हैदराबादमधील चौथ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाला २४ धावांनी पराभव पत्कारावा लागला. भारताचे गोलंदाज या सामन्यात अपयशी ठरल्याने विडिंज संघाने धावांचा डोंगर उभारला. भारताच्या या पराभवानंतर मालिका २-२ अशी बरोबरीत आली आहे आणि अखेरच्या टी-२० सामन्यात या मालिकेचा निकाल लागणार आहे. पण भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर माजी खेळाडू सुनील गावस्कर चांगलेच संतापले आहेत.
या पराभवानंतर खेळपट्टीवरून सुरू असलेल्या चर्चेला भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय संघाच्या पराभवासाठी खेळपट्टीला जबाबदार धरण्याऐवजी गोलंदाजांनी केलेल्या चुका लक्षात घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय गोलंदाजांनी अनेकदा फलंदाजांच्या टप्प्यात चेंडू टाकले, त्यामुळे खेळपट्टीला दोष देण्यात अर्थ नसल्याचं गावसकर यांनी स्पष्ट केलं.
जिओहॉटस्टारशी बोलताना गावस्कर यांनी तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यात भागीदारी सुरू असतानाही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी अनेक फुलटॉस चेंडू टाकल्याचं सांगितलं. मात्र, त्यानंतर पाहुण्या संघाच्या गोलंदाजांनी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि यॉर्करचा प्रभावी वापर केला. त्यामुळे त्यांना यश मिळालं.
भारताच्या पराभवानंतर सुनील गावस्कर गोलंदाजांवर का संतापले?
“आपण अनेकदा खेळपट्टीवर चर्चा करतो आणि गोलंदाजांना मदत मिळत नसल्याचा आरोप करतो. पण तुम्ही फुलटॉस चेंडू टाकत असाल, तर त्यासाठी खेळपट्टीला दोष देता येणार नाही,” अशा शब्दांत गावस्कर यांनी भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला.
गावसकर यांनी पुढे सांगितलं की, खेळपट्टीचा योग्य फायदा घेण्यासाठी गोलंदाजांनी चेंडू योग्य टप्प्यावर टाकणं आवश्यक आहे. फुलटॉस किंवा खेळपट्टीच्या मधल्या भागात पडणारे चेंडू टाकून गोलंदाज फलंदाजांना सहज धावा करण्याची संधी देतात. “गोलंदाजांनी योग्य टप्प्यावर चेंडू टाकण्यास किंवा यॉर्करचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली, तेव्हाच त्यांना यश मिळालं,” असंही गावसकर यांनी नमूद केलं.
भारतीय गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी
चौथ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २४७ धावांचा डोंगर उभारला. शे होपने आघाडीवर राहून शतकी खेळी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येत महत्त्वाचं योगदान दिलं. भारतीय गोलंदाजांना काही टप्प्यांवर वेस्ट इंडिजच्या धावगतीला लगाम घालण्यात यश आलं, मात्र सातत्यपूर्ण गोलंदाजी करण्यात त्यांना अपयश आलं.
प्रिन्स यादवचा अपवाद वगळता भारतीय गोलंदाजांना प्रभावी गोलंदाजी करता आली नाही. वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ५२ धावा दिल्या. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील नव्याने तयार केलेल्या खेळपट्टीवर चेंडू काही वेळा थांबून येत होता, तसेच उसळीही मिळत होती. मात्र, गावस्कर यांच्या मते, भारतीय गोलंदाजांना या परिस्थितीचा योग्य फायदा घेता आला नाही.
