Sunil Gavaskar on Ravindra Jadeja No Ball: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका नुकतीच संपली असून भारताने या मालिकेत १-० असा विजय मिळवला. भारताने पहिला सामना जिंकला, तर दुसरा सामना श्रीलंकेने कडवी झुंज देत अनिर्णित राखला. यादरम्यान भारताच्या गोलंदाजी विभागातील फिरकीपटूंच्या नो बॉलने सर्वांचं लक्ष वेधलं. यादरम्यान वरिष्ठ खेळाडू रवींद्र जडेजाचे नो बॉल व त्याबाबत भारताच्या फिरकीपटू कोचने दिलेल्या वक्तव्यावर सुनील गावस्कर संतापले आहेत.

भारत-श्रीलंका कसोटी मालिकेतील रवींद्र जडेजाच्या वारंवार नो-बॉल टाकण्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. आता भारताचे दिग्गज माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये वारंवार नो-बॉल टाकणाऱ्या गोलंदाजांवर दंडात्मक कारवाई करण्याची वेळ आली आहे, असं मत व्यक्त केलं आहे.

जडेजाने दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये अनेक नो-बॉल टाकले. २०२१ पासून त्याच्या नावावर ८५ हून अधिक नो-बॉलची नोंद आहे. पदार्पणवीर सारांश जैनलाही कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या डावात फ्रंट-फूटच्या नियमाचं पालन करताना अडचणी आल्या आणि त्याने अनेक नो-बॉल टाकले. भारताचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सैराज बहुतुले यांनी मिश्कीलपणे कसोटीत नो-बॉलनंतर फ्री-हिट देण्याचा नियम केल्यास गोलंदाजांना नो-बॉल टाळण्यास मदत होऊ शकते, असं सुचवलं होतं. मात्र, गावस्कर यांना कसोटी क्रिकेटमध्ये असा बदल करायचा नाही.

गावस्कर यांनी मिड-डेमधील आपल्या कॉलममध्ये लिहिलं, “भारतीय गोलंदाजांनी टाकलेल्या नो-बॉलची बरीच चर्चा झाली. या मुद्द्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, कारण यामुळे सामन्याचं स्वरूपच बदलू शकतं. खेळातील काही गोष्टी पूर्णपणे खेळाडूंच्या नियंत्रणात असतात. त्यापैकी फलंदाजाने गार्ड घेणं आणि गोलंदाजाने नो-बॉल न टाकणं या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खेळाडू मुलाखती देताना अनेकदा आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी करण्याबद्दल बोलतात. आज धावण्याच्या अंतराचं मोजमाप करण्यासाठी टेप उपलब्ध असताना गोलंदाजाने क्रीज ओलांडण्याचं कोणतंही कारण असू नये.”

कसोटी क्रिकेटमध्ये नो-बॉलनंतर फ्री-हिट देण्याची सूचना गावस्करांनी फेटाळून लावली. अशा शिक्षेमुळे फलंदाजांना सहज धावा करण्याची आणखी एक संधी मिळेल आणि कसोटी क्रिकेटमध्ये धावा करणं अधिक सोपं होईल, असं त्यांचं मत आहे.

गावस्कर म्हणाले, “भारताच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकांनी मिश्कीलपणे नो-बॉलनंतर फ्री-हिट दिल्यास ही चूक कमी होऊ शकते, असं सुचवलं. पण कृपया या शिक्षेच्या माध्यमातून कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांसाठी धावा करणं आणखी सोपं करू नका. आधीच एका षटकात बाऊन्सरची संख्या दोनपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे आणि सीमारेषाही जवळ आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे धावा करणं थोडं सोपं झालं आहे.”

नो-बॉलची जबाबदारी केवळ गोलंदाजांवर टाकण्याच्या बाजूने गावस्कर नाहीत. गोलंदाजी प्रशिक्षकालाही गोलंदाजाला ठोठावलेल्या दंडाच्या निम्म्या रकमेचा दंड करावा, अशी त्यांनी सूचना केली आहे. गावस्कर यांनी लिहिलं, “त्याऐवजी प्रत्येक पुढील चुकीसाठी दंडाची रक्कम दुप्पट का करू नये? त्यासोबत गोलंदाजी प्रशिक्षकालाही त्या दंडाच्या निम्मी रक्कम द्यावी. या दंडातून जमा होणारी रक्कम खेळाडू संघ सोडण्यापूर्वी होणाऱ्या अखेरच्या टीम डिनरसाठी वापरता येईल.”

“उदाहरणार्थ, थ्रो करताना बॅकअपला न जाणं किंवा मैदानावर एखादी गोष्ट योग्य पद्धतीने न करणं यासाठीही दंड असू शकतो. दंड द्यायचा की नाही, यावर संपूर्ण संघ मतदान करू शकतो. हा एक मजेशीर उपक्रम ठरू शकतो आणि त्यामुळे संघातील खेळाडूंमधील नातंही अधिक घट्ट होऊ शकतं,” असं गावस्करांनी म्हटलं.